रमजान ईद एकतेचा संदेश देणारा पवित्र सण – आकाश बाफना
रमजान ईद हा सण समाजात एकोपा, बंधुत्व आणि सर्वधर्म समभावाची भावना दृढ करणारा आहे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी व्यक्त केले.
जामखेड शहरातील मोगलपुरा परिसरात खाजमोद्दीन बाबा दर्गाच्या उरूसानिमित्त आयोजित इफ्तार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या उपक्रमात विविध समाजघटकांतील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
आकाश बाफना पुढे म्हणाले की, भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे सर्व धर्म एकत्र नांदतात. रमजान ईदसारखे सण आपल्याला परस्पर सन्मान, प्रेम आणि शांततेचा मार्ग दाखवतात. जामखेडमध्येही ही एकतेची परंपरा अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
खाजमोद्दीन बाबा दर्गा हा परिसरातील धार्मिक सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील भेदभाव कमी होऊन एकात्मतेची भावना अधिक वृद्धिंगत होते, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोगलपुरा यंग पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जाकीर शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सादिक शेख यांनी केले.