गोरगरिबांच्या दोनशे टपऱ्या एका दिवसात जमिनदोस्त पण मोठ्यांना वेगळा न्याय का? जामखेड मध्ये टपरी धारकांची व्यस्था
सध्या शहरात अतिक्रमणाच्या विषयावर आंदोलन सुरू आहे. रस्ता रुंदीकरण आणि कारवाईच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले आहे. काही जण माणुसकीच्या नावाने भूमिका मांडत आहेत, तर काही जण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत. यामुळे एका टपरीधारकांने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की आमच्या दोनशे टपऱ्या एका दिवसात जमिनदोस्त केल्या मोठ्या इमारती तशाच आहेत.
त्या आताशहर विकासासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी अडथळा निर्माण होत असलेले अतिक्रमणे हटविताना दुजाभाव होताना दिसत आहे.
आज शहरात माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. विकास सर्वांना सोबत घेऊन व्हावा, कोणाचं घर उध्वस्त होऊ नये — हे ऐकून आनंदच होतो.
पण एक प्रश्न मनाला सतत टोचतो…
जेव्हा शहरातील अतिक्रमण हटवताना हातावर पोट असणाऱ्या सुमारे २०० गोरगरीबांच्या टपऱ्या एका दिवसात जमीनदोस्त केल्या गेल्या, तेव्हा हीच संवेदनशीलता कुठे होती? तेव्हा त्या कुटुंबांचे अश्रू कोणी पाहिले का? त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा, रोजीरोटीचा प्रश्न कोणी विचारात घेतला का?
इतकंच नव्हे, तर या कारवाईनंतर काही टपरीधारकांवर इतका मानसिक व आर्थिक ताण आला की त्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटना देखील घडल्या. त्या वेळी शहरातील संवेदनशीलतेचा आवाज कुठे होता?
आज शासकीय जागेवर मालकी हक्क नसताना उभ्या असलेल्या पक्क्या बांधकामांवर कारवाईची वेळ आली, तर अचानक माणुसकी जागी होते?
✔ ज्यांची जागेची ७/१२ उताऱ्यावर नोंद आहे, त्यांची जागा जर रोडमध्ये येत असेल तर अशांना शासन नियमानुसार मोबदला देते. ✔ मोबदला नको असेल, तर ज्यांची मालकी हक्काची जमीन आहे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला रितसर जाहीर निवेदन देऊन विनंती करावी — “आमची घरे उध्वस्त करू नका.” ✔ पण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम ठेवण्याचा आग्रह कसा योग्य ठरेल?
जेव्हा २०० टपऱ्या हटवल्या गेल्या, तेव्हा अनेक धनदांडगे लांबून पाहत होते. आज मात्र त्यांच्याच अतिक्रमणांवर कारवाईची वेळ आली, तर शहरात भावनिक वातावरण तयार केले जात आहे.
प्रश्न सरळ आहे — गोरगरीबांवर नियम आणि धनदांडग्यांवर माणुसकी? हे दुहेरी मापदंड का?
आणखी एक प्रश्न — या धनदांडग्यांचे अतिक्रमण वाचवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत आहे? यांचे पाठिराखे कोण?
जामखेडचा विकास व्हावा, पण तो कायद्याच्या चौकटीत आणि सर्वांसाठी समान न्यायानेच व्हावा.
दुहेरी मापदंडांचा बळी ठरलेला उध्वस्त टपरीधारकांने आपली व्यथा जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केली.