अवधूत पवार यांचे उपोषण स्थगित, साखळी उपोषण सुरुच राहणार, जामखेड बंद मागे
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी. लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाब सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. या उपोषणाला सर्व जामखेड च्या जनतेचा व सर्व पक्षीयांचा पाठिंबा होता. तसेच उद्या जामखेड बंदची हाकही देण्यात आली होती. पण चार मार्चला अतिक्रमण बाबत पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांच्या सहकार्याने हद्द निश्चित कामास सुरुवात केली जाईल असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता चेमटे यांनी दिले तेव्हा अवधूत पवार यांनी उपोषण स्थगित करत, साखळी उपोषण सुरुच राहणार असे सांगितले व जामखेड बंद मागे घेण्यात आला.
आज दुपारी तीन वाजल्यापासून तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, ठेकेदाराचे प्रोजेक्ट मँनेजर, राष्ट्रीय महामार्ग अभियंता चेमटे, गुणवत्ता नियंत्रक यांच्या बैठका सुरू होत्या पाच तासानंतर यावर एकमत झाले व चेमटे यांनी चार तारखेपासून हद्द निश्चितीच्या कामास सुरुवात करतो असे लेखी दिले तेव्हा तहसीलदार यांच्या हस्ते अवधूत पवार यांनी लिंबू रस घेऊन उपोषण स्थगित केले. यावेळी सर्व पक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदया दि.२६.२.२०२६ रोजीचा सर्व पक्षीय व सामाजिक संघटनानी जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ – डी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणा मुळे जामखेड शहर बेमुदत बंद पुकारला होता.तो मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री.चेमटे यांनी ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची हद्द निश्चित करण्याच लेखी दिल्यामुळे आमरण उपोषण व उद्याच सर्व पक्षीय बंद स्थगित करत आहोत.परंतु तो पर्यंत सर्व पक्षीय साखळी उपोषण चालू राहणार आहे. वेळेत हद्द निश्चित न झाल्यास आंदोलन, आणि बंद याची धार तीव्र स्वरूपात करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे.
नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने सुरळीत पणे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता उद्यापासून साखळी उपोषण सुरु राहणार आहे. व हद्द निश्चित झाल्यावर अतिक्रमण निघते का हेच पाहणे महत्त्वाचे आहे.
अतिक्रमण मुक्त शहरासाठी सर्व जनतेने व नागरिकांनी अवधूत पवार यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या साखळी उपोषणालाही सर्वाचा पाठिंबा असेल.