जामखेड शहरात धुम स्टाईल ‘चेन स्नॅचिंग’चे पाेलिसांपुढे आव्हान
पोलीसांनी चैन चोरांचा बंदोबस्त करावा – रोहिणी काशिद
जामखेड शहरात सध्या धुम स्टाईल चेन स्नॅचिंग’चे प्रकार वाढले असून एका दिवसांत तीन ठिकाणी गंभीर प्रकार घडलेले आहेत. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ताबडतोब पोलीसांनी या भुरट्या चैन चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षा रोहिणी संजय काशिद यांनी केली आहे.
सध्या मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू समारंभ मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यातच महिला आपल्या स्नेह जणांच्या घरी हळदी कुंकू समारंभासाठी ये जा करतात अंगावर मौल्यवान दागिने असतात याचाच फायदा साखळी चोर उठवितात एकाच दिवसात तीन ठिकाणी प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकाच दिवशी तीन ठिकाणी थरार
पहिली घटना – सारोळा रोडवर एक महिला गाडीवर जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे गंठण हिसकावले. झटापटीत १ तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.
दुसरी घटना – एच. यु. गुगळे यांच्या दुकानातून खरेदी करून बाहेर पडलेल्या एका महिलेवर पाळत ठेवून चोरट्यांनी चक्क पोलीस स्टेशनजवळच त्यांना गाठले.गाडी आडवी लावून दागिने ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने धाडसाने प्रतिकार केल्याने चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी तातडीने पाठलाग केला, मात्र चोरटेमोरे वस्तीमार्गे बीड रोडकडे पळून गेले.
तिसरी घटना – बीड रोडवरून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या महिलेला याच चोरट्यांनी गाठले आणि त्यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे दागिने लंपास करून पोबारा केला.
साखळी चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.सध्या संक्रांतीनंतर हळदी-कुंकवाचे दिवस सुरू असून, महिलांची वर्दळ वाढलेली आहे. याचाच गैरफायदा घेत साखळी चोर सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
प्रतिक्रिया ———————————
पोलीस स्टेशनसमोरच महिलांवर साखळी चोरीचा धाडसी प्रयत्न होणे हे अत्यंत धक्कादायक व संतापजनक आहे. ही घटना केवळ महिलेवरील हल्ला नसून संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेवरचा घाला आहे. साखळी चोरीचे वाढते प्रकार चिंताजनक असून पोलीस यंत्रणा सतर्क होणे गरजेचे आहे. महिलांची सुरक्षितता ही मागणी नाही. हक्क आहे. महिलांची सुरक्षितता हक्काची जबाबदारी आहे. महिलांनीच स्वतःचे रक्षण करावे, संक्रांतीनंतरच्या हळदी-कुंकवाच्या काळात साखळी चोर सक्रिय झाले असून पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी. महिलांनी दागिने घालून जाताना खबरदारी घ्यावी. रोहिणी संजय काशिद अध्यक्षा – महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड