Sunday, November 22, 2026
Home ताज्या बातम्या ना प्रसिद्धीचा हव्यास, ना स्वार्थाची अपेक्षा! ७,५०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या जामखेडच्या संजय...

ना प्रसिद्धीचा हव्यास, ना स्वार्थाची अपेक्षा! ७,५०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या जामखेडच्या संजय कोठारींचा शंभरावा पुरस्कार!

0
2
ना प्रसिद्धीचा हव्यास, ना स्वार्थाची अपेक्षा! ७,५०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या जामखेडच्या संजय कोठारींचा शंभरावा पुरस्कार!

जामखेड न्युज – – – – – 

ना प्रसिद्धीचा हव्यास, ना स्वार्थाची अपेक्षा! ७,५०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या जामखेडच्या संजय कोठारींचा शंभरावा पुरस्कार!

 

स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या जीवनाला महत्त्व देत तब्बल चार दशकांपासून अविरत मानवसेवेचा वसा जपणारे जामखेडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सेवाकार्याचा राजगुरुनगर येथे दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणारा सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘मानव सेवा पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत मिळालेला हा त्यांच्या जीवनातील शंभरावा पुरस्कार ठरला आहे. साडेसात हजारांहून अधिक अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देत त्यांचे प्राण वाचविण्याच्या कार्यामुळे संजय कोठारी यांच्या सेवेचा गौरव सर्वत्र होत आहे.

या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आशीर्वचन देताना प.पू. प्रशांतऋषीजी महाराज यांनी संजय कोठारी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांचे मानवतावादी कार्य केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण जैन समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानची स्थापना २०१५ मध्ये आनंद शिष्यरत्न परमपूज्य प्रशांतऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने कासारवाडी येथे चातुर्मासादरम्यान करण्यात आली.

धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंची सेवा करणे हा प्रतिष्ठानचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजारांहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

शिक्षण, क्रीडा, धार्मिक, आरोग्य, साहित्य आणि मानवसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जैन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा प्रतिष्ठानने सुरू केली आहे. गेल्या सात वर्षांपासून प.पू. प्रशांतऋषीजी महाराज यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.
यंदा राजगुरुनगर येथे प.पू. प्रशांतऋषीजी महाराज, प.पू. मधुस्मिताजी म.सा. आणि प.पू. विजय स्मिताजी म.सा. यांच्या चातुर्मासानिमित्त तसेच प.पू. प्रशांतऋषीजी महाराज यांच्या ४६ व्या दीक्षा दिनानिमित्त जैन स्थानकाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.


अपघातग्रस्तांसाठी २४ तास धावणारा माणुसकीचा हात!
संजय कोठारी यांचे गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. अनाथ मुले, गरजू विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला आणि समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत. मात्र, त्यांच्या सेवाकार्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणे.

अपघाताची माहिती मिळताच वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेणे, जखमींना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांच्या उपचारांसाठी प्रयत्न करणे, हे काम त्यांनी सेवाभावाने स्वीकारले आहे. दिवस असो वा रात्र, कोणतीही वेळ असो, संकटात सापडलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ते तत्पर असतात. त्यांच्या या अविरत प्रयत्नांमुळे आजवर साडेसात हजारांहून अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे.
कोणताही स्वार्थ न ठेवता, प्रसिद्धीची अपेक्षा न करता माणुसकीच्या भावनेतून सुरू असलेल्या या कार्याची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेतली आहे. आता शंभराव्या पुरस्काराने झालेला गौरव त्यांच्या चार दशकांच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.

विविध क्षेत्रांतील आणखी तीन मान्यवरांचा गौरव
या पुरस्कार सोहळ्यात आरोग्यसेवा, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या आणखी तीन मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
आरोग्यसेवा क्षेत्रातील पुरस्कार आपुलकी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. प्रितेश मनोत यांना प्रदान करण्यात आला. कर्करोगग्रस्त रुग्णांना तुलनेने कमी खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याचे कार्य आपुलकी हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जात आहे.
प्रशासन सेवा क्षेत्रातील पुरस्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मनोज शेटिया यांना प्रदान करण्यात आला. कनिष्ठ अभियंता पदापासून शहर अभियंता पदापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि प्रशासकीय क्षेत्रातील योगदान याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
महिला सक्षमीकरण क्षेत्रातील पुरस्कार राजगुरुनगर येथील चैतन्य संस्थेला प्रदान करण्यात आला. महिलांचे बचतगट, विविध उद्योगांना प्रोत्साहन आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाऱ्या या संस्थेच्या वतीने अध्यक्षा डॉ. सुधाताई कोठारी आणि रेखाजी शत्रिय यांनी पुरस्कार स्वीकारला.
या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सुंदर ट्रॉफी, शाल आणि पंचरंगी पट्टा असे होते. आचार्य सम्राट प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या नावाने प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया आणि राजगुरुनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री चंद्रशेखर लुंकड, कोषाध्यक्ष प्रणित बागमार, विश्वस्त विलासकुमार पगारिया, दिलीप भन्साळी, संदीप चोरडिया, वसंतलाल बोरा, श्री संघाचे महामंत्री चंदन खारीवाल, माजी अध्यक्ष विजय भन्साळी, संतोष बोथरा, प्रदीप कासवा, प्रकाश गदिया, लालचंद कर्नावट, सुशील शिंगवी, सुनंदा भन्साळी, योगिता भन्साळी, अजित लुनावत, विपुल कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पुरस्कारार्थींचे सहकारी, उद्योजक कांतीलाल कोठारी, साखर सम्राट अशोक चोरडिया, पत्रकार मिठुलाल नवलाखा, निलेश वानगोता यांच्यासह मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन खारीवाल आणि डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले, तर अजय बलदोटा यांनी आभार मानले.
शंभर पुरस्कारांचा टप्पा गाठणारे संजय कोठारी यांचे कार्य जामखेडसाठी अभिमानास्पद ठरले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणारी त्यांची रुग्णवाहिका म्हणजे संकटाच्या क्षणी अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे. चार दशकांची अविरत मानवसेवा आणि हजारो नागरिकांना मिळालेले जीवनदान यामुळे संजय कोठारी यांचा हा सन्मान खऱ्या अर्थाने माणुसकीचा गौरव ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!