नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्तीस प्रारंभ, शेतक-यांमध्ये समाधान. भाजपा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे यांच्या मागणीला यश

0
63

जामखेड न्युज——-

नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्तीस प्रारंभ, शेतक-यांमध्ये समाधान.भाजपा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे यांच्या मागणीला यश

जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्तीस बुधवारी प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांच्यासह सबंधीतांना निवेदन देवून लक्ष वेधले होते.

जवळा परिसरातील सीना व नांदणी ( कवतुका ) नदीला सप्टेबर महिण्यात आलेल्या पुरात या नद्यांवरील बहुतांश बंधारे फुटुन गेले होते.त्यामुळे लगतची शेतीचे मोठे नुकसान झाले होते. लगतची शेतजमीन उभ्या पिकासह वाहून गेल्याने, शेतक-यांना मोठा फटका बसला होता. या बंधा-यांची तातडीने दुरूस्ती केली नाही, तर उन्हाळयात या भागात तीव्र पाणीटंचाईचा लोकांना सामना करावा लागणार आहे. ही बाब भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष व ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन आजीनाथ हजारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया , जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, जलसपंदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश थोरात यांच्या निदर्शास आणून देतानाच, तसे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने पावले उचलत, नांदणी (कवतुका) नदीवरील बंधा-याच्या दुरूस्तीला प्रारंभ केला आहे. नांदणीवरील बंधारे दुरूस्तीसाठी पोकलेन दाखल झाले असून, बंधारे दुरुस्तीची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.

दरम्यान प्रत्यक्ष कामावर जावून आजीनाथ हजारे यांनी भेट देवून पाहणी केली.यावेळी जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी कैलास बागुल हेही उपस्थित होते.

नदीवरील बंधारे पुन्हा सक्षम करण्यासाठी मातीभराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक अभियंते व कामगारांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर माती, दगड व वाळूचा वापर करून बंधाऱ्यांची मजबुती केली जात आहे. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी तात्पुरत्या संरचना उभारल्या जात आहेत, ज्यामुळे दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे पार पडू शकेल.

सध्या एक पोकलेन मशीन कार्यरत असून, लवकरच आणखी दोन पोकलेन व चार टिपर मशीन दाखल होणार आहेत. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, येत्या काळात या भागात टंचाई भासणार नाही. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतक-यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

चौकट
सध्या एक पोकलेन मशीन कार्यरत असून, लवकरच आणखी दोन पोकलेन व चार टिपर मशीन दाखल उपलब्ध होणार असून, त्यानंतर तातडीने काम पुर्ण होईल.

— कैलास बागूल
जलसंधारण अधिकारी
जिल्हा परिषद उपविभाग जामखेड

चौकट

जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया आणि सबंधीतांना दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेवुन, नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्तीस प्रारंभ झाला असल्याने शेतक-यांमध्ये समाधान आहे.

— आजीनाथ हजारे
जिल्हा कोषाध्यक्ष – भाजपा
चेअरमन – ज्योतीक्रांती मल्टीटेट

चौकट –

शेतक-यांकडून स्वागत व कौतुक
——————————————
स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या तातडीच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई टळण्याची आशा निर्माण झाली असून, आजीनाथ हजारे यांच्या सामाजिक जाणीव, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांविषयी कौतुक व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here