जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगत घेऊ लागली आहे. प्रमुख पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी (श प) गट यांच्यात खरी चुरस असतांनाच शिवसेनेच्या गळाला नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक बडा मासा लागला आहे. तसेच शिवसेनेने पक्ष निरिक्षक म्हणून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची निवड केली आहे. यातच तिसरी आघाडी मध्येच मुसंडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे.
महायुती भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पवार पक्ष स्वतंत्र लढणार असेच चित्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर न राहता काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बरोबर तिसऱ्या आघाडीत सहभागी झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष बरोबर आहे. यातच भाजपाचे आकाश बाफना अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत होते. भाजप कडून तिकीट मिळत नाही तरीही ते नगराध्यक्ष पदासाठी लढणारच असा पवित्रा घेतला यातच ते शिवसेनेच्या गळाला लागले यामुळे धनुष्यबाण कोणाला छेदणार असा प्रश्न जामखेड करांना पडला आहे.
भाजपा व राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक नगरसेवक फिक्स झालेले दिसतात… मात्र आपल्या प्रभागातील आपला उमेदवार कोण? कोणत्या पक्षाकडून कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.जामखेड – नगरपरिषदेच्या राजकीय रणधुमाळीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह १२ प्रभागातील २४ शिलेदारांची व एक नगराध्यक्ष उमेदवारी पडद्याआडून ‘फिक्स’ करण्यात आलेली आहे. ऐनवेळी बंडोबांची कुटील कारस्थाने रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी ‘बंडोबांची’ मनधरणी करून त्यांना पुन्हा आपल्यात आणण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडूनही राजकीय कसरत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. इच्छुक उमेदवार या प्रभागात मीच कसा निवडून येऊ शकतो, याचे दावे करू लागला असून पक्षश्रेष्ठींवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. यासाठी प्रत्येक उमेदवार घरभेटींचे आयोजन करताना शक्ती प्रदर्शन करण्याचे विसरत नाहीत.
नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने(शिंदे गट) पक्षनिरीक्षक म्हणून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची नियुक्ती केली आहे. लोखंडे तीन वेळा कर्जत-जामखेडचे आमदार, तर दोन वेळा शिर्डीचे खासदार राहिले आहेत. त्यांच्या खांद्यावरआलेली ही जबाबदारी राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण करणारी आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवारांबरोबरच आता माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची शहराच्या राजकारणात एन्ट्री होत आहे.
त्यामुळे शिवसेनेला नवसंजवनी मिळण्यास मदत होईल, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढेल, हे मात्र निश्चित. महायुतीची घडी बसलेली नसताना लोखंडे यांना मिळालेली जबाबदारी एक नवीन आव्हान निर्माण करणारी ठरणार आहे.
लोखंडे हे शिवसेनेचे नेते असले तरी पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आहेत. मात्र प्रा. राम शिंदे यांच्याशी त्यांचे सुत फारसे जुळत नसल्याने भाजपासाठी ही नियुक्ती तापदायक ठरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. लोखंडे यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात टिकून आहे. त्यांनी आपलेपणा जपल्यामुळे जनतेशी नाळ कायम आहे.
आकाश बाफना हे अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत आहेत. आता धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण कोणाला छेदणार ? हे लवकरच कळणार आहे.