मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा
“मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते; पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक रोड वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
पूल झाला असता, तर गर्दी टळली असती
हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचं शैल्य आहे, त्यामुळे हा पूल बांधायचं डोक्यात आहे,” असंही ते म्हणाले. “मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती; पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करून रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे,” असं गडकरी यांनी सांगितलं.
सुरत-नाशिक-नगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी
सुरत-नाशिक-नगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली. समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.
मुंबईत विकासासाठी जागाच शिल्लक नाही
“महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. त्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यावसायाचं महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झालं तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करून पुढील २५ वर्षांचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली, तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.