जामखेडमध्ये ट्रॅक्टर च्या किंमतीबाबत शोरूम चालकांचा मनमानी कारभार, शेजारच्या तालुक्यात कमी किंमती
शेतकरी आक्रमक तहसीलदार यांना निवेदन
जामखेड तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्याची ट्रॅक्टरसाठी नावे आलेली आहेत. जीएसटी कमी होऊन देखील मागील किंमती प्रमाणे जामखेड तालुक्यात ट्रॅक्टर ची विक्री केली जात आहे. मात्र हेच ट्रॅक्टर ची किंमत शेजारील तालुक्यात 75 ते 80 हजार रूपये कमी आहे. मग जामखेड मध्येच जास्त का? असा सवाल करत शेतकरी आक्रमक झाले. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना याबाबत निवेदन देत शेतकऱ्याची लूट थांबविण्याची मागणी केली.
जामखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेतंर्गत २५ टक्के सबसिडी वर अनेक शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत. तसेच शोरूम मधुन तसे फोन येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यावयाची आहेत. ते शोरूम मध्ये जाऊन चौकशी करतात. जीएसटी कमी होऊनही किंमती जुन्या प्रमाणेच आहेत तसेचशेजारी तालुक्यात व जामखेड तालुक्यात ट्रॅक्टर किंमतीत 75 ते 80 हजार रुपये फरक पडत आहे. असे का? म्हणून एकाच कंपनीच्या ट्रॅक्टर ची सगळीकडे एकच किंमत असावी शेतकऱ्यांनी लूट थांबावी म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मंगेश ( दादा) आजबे म्हणाले की. सध्या जामखेड तालुक्यात सर्व ट्रॅक्टर शोरूम चालकांचा मनमानी कारभार दिसून येत आहे. वाढत्या किंमतीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ट्रॅक्टर कंपनीच्या मालकांनी शोरूम चालकांवर वाढत्या किंमतीबाबत आवर घालणे आवश्यक आहे. शेजारच्या तालुक्यात कमी किंमती व जामखेड तालुक्यात जास्त किंमत असे का यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना शेतकरी दत्तात्रय साळुंके म्हणाले की, आम्ही आमच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता शेजारी तालुक्यात व जामखेड मध्ये ट्रॅक्टर किंमतीत फरक पडत आहे. असे का? शासनाचे सव्वा ते दीड लाख रुपये सबसिडी वाढीव किंमतीमुळे मिळतच नाही. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.
एक तर अतिवृष्टीने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेले आहेत. यातच ट्रॅक्टर शोरूम चालकांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न होत आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर दत्तात्रय सांळुके, वैभव कसाब, नारायण सांळुके, केशव सांळुके, बाळासाहेब इथापे, रोहन सांळुके, प्रविण सांळुके यांच्या सह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
याबाबत प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे म्हणाले की. निवेदन शासनाकडे पाठवून योग्य पाठपुरावा केला जाईल.