सभापती प्रा राम शिंदे यांच्या कुटुंबियांचीही विचारपूस
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावाजवळून वाहणाऱ्या सीना नदीनेही पात्र ओलांडलं असून दिवसभरात २५० पेक्षाही अधिक नागरिकांना प्रशासन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षित स्थळी हलवलं. गावाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसानीची तीव्रता मोठी आहे. आज सायंकाळी आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन राहिलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सहकार्य करून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत आश्वस्त केलं. तसंच गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं.
राजकारण बाजूला ठेवून रोहित पवारांचा मदतीचा हात चोंडी गावात सीना नदीचे पाणी शिरले असून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या घरालाही पाण्याने वेढा दिला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी तातडीने याठिकाणी भेट देऊन त्यांचे राजकीय विरोधक प्रा. राम शिंदे यांच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली तसंच गावातही पुराच्या पाण्यात अडकलेले वृद्ध नागरीक, लहान मुले यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली आणि त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली.
सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडत असल्याने रविवारी पुन्हा एकदा सीना नदीला महापुर आला. सीना नदीच्या महापुराने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत रौद्ररूप धारण केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी गावाला सीना नदीच्या महापुराचा वेढा पडला आहे. शिंदे यांच्या बंगल्याभोवती गुडघाभर पाणी आहे. चोंडीला चोहोबाजुने महापुराचा वेढा पडला आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.चोंडीत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहेत. महापुराने हाहाकार उडवला आहे.
शनिवारी रात्री व रविवारी सकाळी सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे सिना नदीला ऐतिहासिक महापुर आला. मागील पंधरा दिवसांत दोनदा आलेल्या महापुरापेक्षा आजचा महापुर मोठा विध्वंस घडवणारा ठरू लागला आहे. चोंडीला महापुराने वेढा दिला आहे. या महापुराचा मोठा फटका चोंडी गावाला बसला आहे. गावातील अनेक भागात पाणी शिरले आहे. देवकरवाडी पाण्याखाली गेली आहे.
रविवारी सकाळी चोंडीचा पुल पाण्याखाली गेला. या पुलावरून सीना नदी प्रचंड वेगाने वाहत आहे. दुपारी 1 वाजेपासून चोंडी गावातील हेलीपॅड परिसर, तलाठी कार्यालय, विश्रामगृह परिसर,शाळेची मागील बाजू, त्याचबरोबर शिल्पसृष्टीतील गार्डन, सभागृह परिसराला पाण्याचा वेढा पडण्यास सुरुवात झाली होती. दोनच्या सुमारास विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या बंगल्याजवळ पाणी आले होते. त्यानंतर चार वाजता शिंदे यांच्या बंगल्यासमोरून गुडघाभर पाणी वाहत होते. संपुर्ण चोंडी जलमय झाली आहे. शाळा, दुकाने पाण्याखाली गेले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी ताबडतोब चौंडीत जाऊन पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदत केली. स्वतः गुडघाभर पाण्यात जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलविले सभापती प्रा राम शिंदे यांच्या कुटुबिंयांचीही चौकशी केली.