पत्रकार सुखी तर समाज सुखी – राजेश्‍वरी दीदी अहिल्यानगर येथे मीडिया संमेलनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापनेवर विचारमंथन

0
242

जामखेड न्युज——-

पत्रकार सुखी तर समाज सुखी – राजेश्‍वरी दीदी

अहिल्यानगर येथे मीडिया संमेलनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापनेवर विचारमंथन

 

पत्रकार सुखी तर समाज सुखी. सामाजिक जबाबदारी पेलणाऱ्या या एका व्यक्तीपासून हजारो सुखी आणि दुखी होवू शकतात. सुख, शांती, चिंतामुक्त पत्रकारितेसाठी मन शांत ठेवावे. तणावमुक्त व नशामुक्त रहावे. कोणत्याही व्यवसायाचा लाभ घ्यावा लोभ करु नये. स्वतःसाठी वेळ काढा यामुळे जीवन सुख शांती व श्रेष्ठ बनू शकणार असल्याचे राजेश्‍वरी दीदी यांनी सांगितले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय, अहिल्यानगर मीडिया विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापना या विषयावर मीडिया संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात प्राचीन काळापासून ते डिजीटल मीडियाचा प्रवासावर विचारमंथन करुन समाजाला दिशा देण्यासाठी शाश्‍वत नैतिक मुल्यांची कास धरुन वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले.

या मीडिया संमेलनाचे उद्घाटन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले. अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दीदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनासाठी मीडिया प्रभागचे माऊंटआबूचे (राजस्थान) राष्ट्रीय समन्वयक डॉ. शांतनू भाईजी, महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक (जळगाव) प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, सदस्य विजयसिंह होलम, प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, सीएसआरडी महाविद्यालयाचे डॉ. सुरेश पठारे, ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले, भूषण देशमुख, श्रीराम जोशी, उद्योजक संतोष पवार, सुप्रभा दीदी, ॲड. निर्मला चौधरी, डॉ. दिपक हरके आदींसह पत्रकार, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विठ्ठल लांडगे म्हणाले की, पहिले बातमीची जागा बातमी ठरवायची, मात्र आता बातमीची जागा संपादक ठरवतात. वृत्तपत्रांना शासकीय निधी नसतो, आजही वृत्तपत्र लोकवर्गणीवर चालतात. मालकांची अपेक्षा, जाहिरातीचे टार्गेट आणि वास्तवता मांडताना अनेकांचे हात थरथरते. मूल्यांची पूर्नस्थापना करताना समाजाचे देखील विचार मंथन होणे आवश्‍यक आहे. स्पर्धेच्या युगात टीआरपी टिकवण्यासाठी भडकाऊ बातम्या दिल्या जात आहे. समाजाने देखील चांगल्याला चांगले म्हणण्याची व चांगले वाचण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे ते म्हणाले.

सुरेश पाटील यांनी पत्रकारितेचा बदलता प्रवाह जाणून घेण्यासाठी इतिहास समजावून घेतला पाहिजे. पत्रकारितेद्वारे व्यवसाय चालवून सामाजिक हित साध्य करायचा आहे. मालकांच्या अपेक्षा, टार्गेट, कमी वेतन व कुटुंबाची जबाबदारी यामध्ये पत्रकार दबला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तर नवनवीन तंत्रज्ञान शिकून स्वत:ला अपडेट करण्याचे आवाहन करुन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना त्याच्या मर्यादा देखील लक्षात घेण्याचे सांगितले.

सुधीर लंके म्हणाले की, मीडिया गतिमान झाल्याने जगणे सुलभ होणे आवश्‍यक होते. मात्र तसे न होता जगणे संकुचित होत आहे. मूल्य हरवत चालले असताना या भूमीतील थोर व्यक्तींचा त्याग, कार्य व विचारांची प्रेरणा घेण्याची आवश्‍यकता आहे. राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या भूमीतील पत्रकारांची वैचारिक ठेवण असल्याने महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे मूल्यशिक्षण सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू-मुस्लिम भेदभाव केला नव्हता. पत्रकारिता सत्य, अहिंसेवर आधारित व स्वातंत्र, समता, बंधुत्वाची पुरस्कर्ती असावी. चांगले मूल्य ठेवून केलेली पत्रकारिता समाजाला दिशा देणारी ठरणार आहे. राजकारणी जाती धर्मात भांडणे लावत आहेत. सत्याला सत्य म्हंटले पाहिजे. भेदभाव मिटवून माणूस जोडण्याचे काम पत्रकारितेतून झाल्यास मूल्यांची पूर्नस्थापना होणार असल्याचे ते म्हणाले.

विजयसिंह होलम यांनी पेनलेस पर्यंत आलेली पत्रकारिता पेनफुल बनली आहे. पत्रकार हे समाजातील जबाबदार घटक आहे. समाज सुधारण्याची यामध्ये क्षमता आहे. यासाठी मूल्याधिष्ठीत काम करणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडिया दुधारी तलवार असून, त्याचा चांगल्या व वाईट कामासाठी देखील वापर होत आहे. समाज आणि पत्रकार एकमेकांशी निगडित आहे. बदलते प्रवाह स्वीकारून जुने मूल्य टिकवावे लागणार आहे. मूल्याधिष्ठीत पत्रकारितेला एआय चा धोका असणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुरेश पठारे यांनी समाजातील सर्व प्रवाह बदलत चालले आहे. मूल्य आऊटडेटेड झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मूल्यांचा दुष्काळ समाजात पडला आहे. वैयक्तिक मूल्यांचा आत्मसात करून समाजात शांतता व एकता भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

भूषण देशमुख यांनी माणूस सशक्त आणि समृद्ध असेल तर पत्रकारिता प्रगल्भ होईल. अनावश्‍यक दडपण घेऊन कामे करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. उद्योजक संतोष पवार यांनी सकारात्मक बदलाची अपेक्षा ठेवून या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

रामदास ढमाले म्हणाले की, जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा आहे. ही परंपरा घेऊन पुढे जावे लागणार आहे. हा इतिहास ज्ञात ठेवून पत्रकारिता केल्यास मूल्यांची पुनर्स्थापना होणार आहे. मूल्य सांगून, शिकून आणि ऐकून येणार नाही, ते आत्मसात करावी लागणार आहे. पत्रकारीतेत मेडिटेशन नसेल, तर काही साध्य होऊ शकणार नाही. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभाला कायदेशीर अधिकार असून, चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

श्रीराम जोशी यांनी समाज बदलला तसा पत्रकारिता देखील बदलली. पत्रकारितेत संवेदनशीलता जपली पाहिजे. संपूर्ण समाज बिघडलेला नसून, चांगले काम देखील सुरु आहे. चांगले काम मांडण्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सोनवणे यांनी पत्रकारिता करताना येणाऱ्या धमक्यांची वास्तवता मांडली. पत्रकारांना संरक्षण नसल्याचा प्रश्‍न उपस्थित करुन स्वतःने नीती मूल्य ठरवून वाटचाल करण्याचे स्पष्ट केले.

26 ते 30 सप्टेंबर रोजी माउंट आबू येथे होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनाचे त्यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा दीदी यांनी केले. आभार निर्मला दीदी यांनी मानले. या संमेलनात सहभागी सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here