कसलाही राजकीय वारसा नसताना सालकऱ्याचा मुलगा आपल्या कर्तृत्ववाने आमदार मंत्री व थेट विधानपरिषदेचे सभापती होतो. ही गोष्ट सामान्य नाही आपल्या मुलाचे कामकाज पाहण्यासाठी आईनाकात नथ, इरकलचं लुगडं घालून थेट विधीमंडळात येते तेव्हा कॅमेऱ्यांचे क्लिक आणि शूट होते.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विविध पक्षाचे आमदार, पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी घेऊन विधिमंडळात येतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन आमदारांची भेट घ्यावी, कामकाज पाहावं असंही अनेकांना वाटतं. मात्र, जेव्हा या विधिमंडळातील विधानपरिषद सभापतीपदी आपला लेक असतो, त्याचं कामकाज पाहण्यासाठी त्यांची आई येते तेव्हा सगळ्यांना आश्चर्यं वाटतं महाराष्ट्राच्या विधिमंडळात नाकात नथणी, अंगावर नऊवारी इरकलचं लुगडं घालून भामाबाई शिंदे येतात, तेव्हा कॅमेऱ्याचे डोळे आपसुकच त्यांच्याकडे वळतात. मात्र, जेव्हा ह्या मातोश्री सभापती राम शिंदेंच्या आई आहेत हे समजते, तेव्हा मात्र मोठ्या संख्येने कॅमेऱ्यांचे क्लिक आणि शूट सुरू होते.
पत्रकारांच्या विनंतीवरुन आईसाहेब देखील सर्वांसाठी आपली अस्सल मराठमोळी, रुबाबदार पोज देऊन सर्वांचेच लक्ष वेधतात. त्यानंतर, त्यांच्यासमवेत असलेले सहकारी भामाबाई शिंदेंना घेऊन सभागृहात जातात. राम शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला होता.
त्यानंतर, राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तेव्हा देखील ते आपल्या आईंना घेऊन पंतप्रधान कार्यालयात गेले होते.
आज विधिमंडळात जेव्हा लेक येथील सर्वोच्च पदावर आहे, तेव्हा लेकाला पाहायला आलेल्या आईचा उर अभिमानाने भरुन आला असले. राम शिंदे यांचे विरोधक आमदार रोहित पवार यांनीही याबाबत खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे.राम शिंदे हे माझे राजकीय विरोधक आहेत.
पण उच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलाला भेटायला जेंव्हा त्यांच्या मातोश्री विधीमंडळात आल्या तेंव्हा त्यांचा ऊर नक्कीच अभिमानाने भरुन आला असेल.आपली संस्कृती-परंपरा जपणारी ही जुनी पिढी आजच्या नवीन पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे. या मातेला माझाही दंडवत! असे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या मातोश्रींचा व्हिडिओ शेअर केला आहे.