जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहाच्या वतीने जामखेड शहरात अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली संकलीत केलेली मदत महाड परिसरातील पुरग्रस्तांना विविध साहित्यच्या माध्यमातून वितरित करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील महाड येथे स्थानिक सामाजिक संस्थेची मदत घेत रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोळसे या गावात १९ पुरग्रस्त कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतका किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
निवारा बालगृहाच्या वतीने जामखेड शहरात अॅड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली २ ऑगस्टला पुरग्रस्तानसाठी मदत फेरी काढण्यात आली होती. यावेळी २५५००/- एवढी रोख रक्कम जमा झाली होती. ही मदत मुख्यमंत्री फंडात देण्याऐवजी प्रत्यक्ष जाऊन द्यावी असे काही नागरिकांनी सुचवले. यामूळे जमा झालेल्या मदतीतून काही जीवनावश्यक वस्तू घेऊन प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेटून मदत करण्याचे ठरले.त्याप्रमाणे
३ ऑगस्टला ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापु ओहोळ, सचिन भिंगारदिवे व अजिनाथ शिंदे महाडला मुक्कामी गेले. महाडच्या परिसरात पाहणी करून तसेच स्थानिक सामाजिक संस्थेची मदत घेऊन रायगडाच्या पायथ्याशी कोळोसे गावातील नातेवाईकांकडे आलेल्या १९ बेघर कुटुंबांना १५ दिवस पुरेल एव्हडा किराणा व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. कोरो संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे ही मदत करणे सोपे झाले. नागेश जाधव व निवृत्त तहसीलदार शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या पुरग्रस्तां पर्यंत पोहचुन त्यांना मदत करता आली. तळीये गावात जान्यास मज्जाव केल्याने, आम्ही महाडमधील पूरग्रस्त जे कोळोसे गावात नातेवाईंकाकडे येऊन राहिले आहेत त्यांना शोधले. त्यांची विचारपूस करून अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. अत्यंत दुःखात हे लोक दिसले. अजूनही त्यांना पूर येईल असे वाटते. सावित्री नदीच्या कडेला राहणाऱ्या सर्वांचे स्थलांतर झाले आहे. राहते घर, संसारपयोगी वस्तू, जवळचे सर्व काही उध्वस्त झाले आहे. पुन्हा तेथे जाऊन राहणार नाही असे पिडीत कुटुंब म्हणतात. गावात राहणाऱ्या लोकांपर्यंत मदत पोहचते पण गावाच्या कडेला असलेल्या वाड्या, पालांवर मदत जात नाही. त्यामुळे तेथील लोक महाड, पोलादपूर, माणगावच्या रस्त्याच्या कडेला काहीतरी मदत मिळेल या आशेवर बसलेली आढळली. चौकशी केली तेंव्हा कळले ,यांच्या पर्यंत कोणी पोहचत नाही.दिवसभर छत्र्या घेऊन बसतात व रात्री नातेवाईकांकडे किंवा उड्डाणपुलाच्या खाली रात्री काढत आहेत.
जामखेडकरांनी उचललेल्या खारीच्या वाटेतून १९ बेघर कुटुंबाना किमान १५ दिवस तरी सुखाचे जगता येईल. हे मात्र नक्की