जामखेड न्युज – – –
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दाै-याला महाविकास आघाडी सरकारचा विरोध होता. तीनही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या दाै-यावर बहिष्कार घातला. राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिला होता. या संघर्षात अखेर राज्यपालांना नमते घ्यावे लागले.
उद्घाटन, बैठका टाळल्या
कोश्यारी आज नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नांदेड विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन होणार होते; मात्र आरोप प्रत्यारोपानंतर आणि राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. नांदेड विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचं राज्यपालांनी टाळलं.
टाळला वाद
उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला; मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही. उद्घाटन नाही तर नाही कमीत कमी राज्यपाल तिथे थांबून वसतिगृहांची पाहणी तरी करतील, अशी अटकळ बांधली जात होती; मात्र संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी उद्घाटन टाळून होणारा वादही टाळला.
राज्यपालांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
नांदेड विद्यापीठातील दोन नव्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार होतं. त्यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने जय्यत तयारी केली होती. या दोन्ही नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलं; मात्र राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केल्यानंचर राज्यपालांनी उद्घाटन करण्याचं टाळलं.
सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांचा अतिरेक
राज्यपालांचा बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकानं बंद ठेवायला सांगितली होती. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा अतिरेक दिसून आला. पोलिसांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवायला सांगितली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
पालकमंत्र्यांचा बहिष्कार
राज्यपाल नांदेड, हिंगोली आणि परभणी दौ-यावर आहेत. तीनही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या दाै-यावर बहिष्कार टाकला आहे. आता फक्त कृषी विद्यापीठातच त्यांचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. हिंगोलीत अतिवृष्टी नाही, विद्यापीठ नाही, तरी तिथं राज्यपालांनी जिल्हाधिका-यांना आढावा बैठक घेण्यास सांगितलं. त्यामुळं तिथं राज्यपालांविरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे.