जामखेड येथे शेतकरी भवन बांधकाम प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे
जामखेड तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी बांधकामाचा प्रस्ताव कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी सादर केला आहे. या मागणीच्या प्रस्तावास संचालक (पणन) यांनी तातडीने मान्यता द्यावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
कर्जत व जामखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीशी संबंधीत विषयांबाबत आढावा बैठक महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 जून, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथे झाली.
यावेळी बैठकीस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव श्री.प्रवीण दराडे, सह सचिव श्री.वि.ल. लहाने, तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच पणन विभागाचे संचालक श्री.रसाळ व उपसंचालक श्री.निंबाळकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.
जामखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी 22 एप्रिल, 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. सदर शेतकरी भवन उभारण्यासाठी शासन अनुदान 50 टक्क्याच्या मर्यादेत दिले जाणार असून उर्वरित 50 टक्के निधी बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जातून उपलब्ध करुन घ्यायचा आहे.
कर्जत येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव संचालक पणन यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात यावा.
तसेच बाजार समितीकडून नियमानुसार सादर होणाऱ्या अन्य बाबींवरील प्रस्तावास देखील तातडीने मान्यता दिली जावी अशा सूचना सभापती महोदय यांनी दिल्या.