कोतवालाच्या मुलाचा रशियात झेंडा, जामखेड च्या रोहित थोरातला आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेत कांस्यपदक
मॉस्को, रशिया येथे नुकतीच मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेड चा खेळाडू रोहित थोरात याने भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक प्राप्त केले. त्याला अहिल्यानगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू व एन आय एस कोच लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोहितचे वुशु असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जितेंद्र सिंग भाजवा, सचिव सोहेल अहमद, ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे सचिव सोपान कटके, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, प्रा मधुकर राळेभात, उमेश देशमुख यांनी हार्दिक अभिनंदन केले.
रोहित थोरात याने यापूर्वी राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळविले आहे. आंतर महाविद्यालयीन वुशु स्पर्धेमध्ये चार सुवर्णपदक, चार वेळा राष्ट्रीय वुशु स्पर्धेमध्ये सहभाग व एक वेळा ऑल इंडिया वुशु स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
यावर्षी भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये रोहितने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहित थोरात हा मूळचा वंजारवाडी या गावचा असून त्याचे वडील कोतवाल म्हणून काम करत आहेत.
रोहित च्या वडिलांनी शिक्षणाबरोबरच मुलाला आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी अहोरात्र कष्ट करून आर्थिक पाठबळ दिले. त्याचे शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी वंजारवाडी गावामध्येच झाले आहे. पाचवी ते सातवी पर्यंत नवीन मराठी शाळा, जामखेड येथे झाले व आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण ल.ना. होशिंग विद्यालय ,जामखेड येथे झाले आहे.
इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत रोहित जामखेड येथील समाज कल्याण वस्तीगृहामध्ये राहिलेला आहे.रोहित थोरात गेली तेरा वर्षापासून लक्ष्मण उदमले व शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मराठी शाळा जामखेड येथे वुशु खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.