जामखेड गोळीबारातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
पहा कोण आहेत आरोपी
जामखेड येथे तरूणावर फायरिंग करणारे ६ आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. यामुळे आता गोळीबार प्रकरणाचा छडा लागणार आहे.
हकिगत अशी की, दि. ०१/०६/२०२५ रोजी फिर्यादी आदित्य बबन पोकळे, वय २०,रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर व साक्षीदार यांचे अनोळखी आरोपी सोबत रस्त्यांवर लघवी करण्याचे कारणावरून वाद झाला होता. यातुन आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांने मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने तीन गोळया फायर केल्या त्यापैकी दोन गोळया हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार, रा. पोकळेवस्ती, जामखेड याचे पायास लागली.
याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. २९३ / २०२५ बीएनएस कलम १०९, ११५ (२),३५२, ३ (५) सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा. पोलीसअधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहीद शेख, संदीप दरंदले, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, गणेश धोत्रे, संतोष लोढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाणे, अमृत आढाव, रोहित मिसाळ,प्रशांत राठोड, भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले.
आज दिनांक ०२/०६/२०२५ रोजी पथक गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभु रायभान भालेकर, रा. निपाणी, संभाजीनगर व त्याचे साथीदारांनी केला असून प्रवरासंगम, ता. नेवासा मार्गाने किया सेल्टॉस व मारूती FRONX अशा कारमधुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता. नेवासा येथे सापळा रचुन
१) प्रभु रायभान भालेकर, वय ३३, रा. निपाणी, छत्रपती संभाजीनगर २) नकुल विष्णु मुळे, वय ४०, रा. खेर्डा,ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर ३) शरद अंकुशराव शिंदे, वय ३८, रा. पुसेगाव, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर ४) गणेश गोविंद आरगडे, वय ३०, रा. खंडाळा, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर ५ )रावबहादुर श्रीधर हारकळ, वय ३५, रा. सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर ६) सुशीलताराचंद गांगवे, वय ३०, रा. पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून किया सेल्टॉस कार क्रमांक एमएच-२०-एफपी-६६२२ वमारूती सुझुकी कार क्रमांक एमएच- २०- जीके-५५८६ असे वाहन व आरोपी नामे प्रभु रायभान भालेकर याने गुन्हयात वापरलेले लायसन्सचे पिस्टल, ०१ राऊंड व ०२ रिकाम्या पुंगळया असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभु रायभान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारासह भूम जि. उस्मानाबाद येथे गेला होता. वाढदिवस झालेनंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याचे कडेला लघवी करण्याचे कारणावरून त्याने त्याचेकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधुन फायरिंग केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीतांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत असून, गुन्हयांचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदर कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे अपरपोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.