—अखेर जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाला यश
श्री क्षेत्र चौंडी ते इंदोर गाडी अहिल्यादेवींच्या जयंती दिवशी सुरू होणार
जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून जामखेड बस आगार, विभाग नियंत्रक, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कडे वारंवार लेखी व तोंडी श्री क्षेत्र चौंडी ते इंदोर गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत सभापती प्रा राम शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ३१ मे पासून दररोज बस सुरू करण्याबाबत आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे अहिल्याभक्तांसह इतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनाच्या औचित्याने एसटी महामंडळाच्या वतीने जामखेड बस आगार अंतर्गत चौंडी ते इंदोर (पुण्यश्लोक एक्सप्रेस) प्रवाशी बस सेवेचा शुभारंभ जयंती दिवशी करण्यात येणार आहे. बस सुरू केल्याबद्दल जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेच्या वतीने सभापती प्रा राम शिंदे यांचे विशेष आभार मानले.
तसेच सभापती प्रा राम शिंदे यांच्या कडे नवीन जामखेड – सुरत, जामखेड – माहुरगड, जामखेड – गाणगापूर, जामखेड – पंढरपूर या बस सुरू करण्याबाबत लक्ष घालून संबंधित विभागास आदेश द्यावेत अशी विनंती जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष गुंदेचा यांनीकेली आहे.