राहुल गांधींच्या ब्रेकफास्टला राऊत तर शहांच्या भेटीला पवार, काय चाललंय महाराष्ट्रात ?

0
207
जामखेड न्युज – – – 
देशात आणि राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडताना दिसत आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींमुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर या निमित्ताने काही नवी समीकरणे जुळून येऊ शकतात का? अशी चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं दिल्लीतील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांसाठी ब्रेक फास्टचं आयोजन केलं होतं. भाजपविरोधात संसदेत एकजुटीनं आवाज बुलंद करण्यासाठी ब्रेकफास्ट मिटिंगचं आयोजन केलं गेलं. या ब्रेकफास्ट मिटिंगला शिवसेनेचे सर्वच खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदारही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या बाजूलाच बसले होते. नाश्त्याच्या टेबलवरही राऊत राहुल गांधींच्या जवळ होते. त्याआधी काल राहुल यांनी राऊतांकडून शिवसेनेची कार्यप्रणालीही जाणून घेतली. शिवसेनेची जडणघडण कशी झाली. शिवसेनेची कार्यपद्धती कशी आहे, हे राहुल गांधी यांनी जाणून घेतल्याने शिवसेना आणि काँग्रेस जवळ येत असल्याच्या चर्चा आहेत.
पवारांची शहांसोबत भेट
काँग्रेस आणि शिवसेनेचे मधूर संबंध होत असतानाच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. अर्थात शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी आल्याने साखर कारखान्यांशी संबंधित विषयासाठी ही भेट होत आहे. शिवाय शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी आल्यानंतर पवार आणि शहा यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. यावेळी पवारांसोबत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. वरवर पाहता ही भेट सहकार संबंधातील असली तरी पवारांच्या या भेटीगाठींमागे अनेक राजकीय अर्थ दडलेले असतात. त्यामुळे या भेटीवरही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवसेनेला पर्याय नाही
शिवसेना आता राज्याच्या सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. शिवाय राज्यात शिवसेना केवळ सत्तेत सहभागी नाही. तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कलाने जाणं भाग आहे. त्यातच शिवसेनेने एनडीएचं नातं तोडल्याने यूपीएच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सामील होण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नाही. केंद्रीय राजकारणात एकटं राहून चालणार नाही. राष्ट्रीय राजकारणात आपली उपस्थिती दाखवण्यासाठी दोन्ही काँग्रेससोबत जाणं ही शिवसेनेची गरज आहे. त्याशिवाय शिवसेनेकडे कोणताच पर्याय नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
भाजप-राष्ट्रवादी जवळ येण्याची शक्यता कमीच
पवार आणि शहा यांची भेट होणार म्हटल्यावर पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्याला कारण म्हणजे पवारांच्या राजकारणाचा कधीच अंदाज येत नसतो. पवारांच्या प्रत्येक राजकीय कृतीचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्याचे परिणाम नंतर दिसू लागतात. त्यामुळे पवार-शहा भेट ही भेट निव्वळ एखाद्या प्रश्नावरील राहणार नसून त्याला अनेक राजकीय पदर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या भेटीचे आताच राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. मात्र, त्याचे परिणाम कालांतराने दिसून येऊ शकतात. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी इतक्यात जवळ येण्याची काहीच शक्यता नाही, असं  राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here