नगरपालिकांचा बिगुल वाजणार,राजकीय पक्ष लागले कामाला
जिल्ह्यातील 12 नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2015-16 मधील संख्येनुसार 259 नगरसेवकपदांच्या जागा आहेत. 2021-22 या वर्षात नऊ नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे निवडणुका जुन्या की नव्या संख्येनुसार होणार याबाबत अद्याप पालिका प्रशासनाला निर्देश प्राप्त झालेले नाहीत. मात्र, राजकीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा या दहा नगरपालिका तर अकोले, शिर्डी, पारनेर, कर्जत व नेवासा खुर्द या पाच नगरपंचायती आहेत. मात्र, शिर्डी नगरपंचायतीला दोन अडीच वर्षांपूर्वीच नगरपालिकेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या अकरा नगरपालिका व चार नगरपंचायती आहेत. कर्जत, अकोले व पारनेर या तीन नगरपंचायतींचा कालावधी 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सध्या 12 नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
2021-22 मध्ये संगमनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, देवळाली प्रवरा व जामखेड या नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत सरासरी दोन ते तीन सदस्यांची वाढ करण्यात आलेली आहे. याच कालावधीत नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, या निवडणुकीचा कार्यक्रम रदृ करण्यात आला होता.
सध्या अकरा नगरपालिका आणि नेवासा खुर्द या नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहेत. वाढीव सदस्यसंख्या मान्य केल्यास 287 जागांसाठी तर अमान्य केल्यास 259 जागांची निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सप्टेंबरअखेरपर्यत नोटिफिकिशन जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही आदेश नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नवीन प्रभागरचना, आरक्षण काढले जाणार की जुनेच ठेवणार हा प्रश्न इच्छुक उमेदवारांना भेडसावत आहे.
न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छूक कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी इच्छूकांची तसेच राजकीय पक्षांची पूर्वतयारी सुरु झाली आहे.