6 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी येत्या 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरवण्यात आला असून, प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसुत्रपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. अशी माहितीसभापती प्रा राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) इथे सहा मे रोजी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच ग्रामीण भागात अशी बैठक होत आहे. बैठकीला तीनच दिवस राहिल्याने जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ उडाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत असताना, त्यांच्याच जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने, यात मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने बैठकीच्या तयारीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी ज्या ठिकाणी होतो, त्याच मैदानावर बैठकीसाठी विस्तीर्ण, असा मंडप उभारला जात आहे. 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारला जात आहे. मंडपात विविध वातानुकूलित कक्ष निर्माण केले जातील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रुम, भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्री परिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन, पत्रकार कक्ष, सुरक्षा व वाहनचालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मंडपात किमान साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. इंटरनेटसाठी (वाय-फाय) व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीच्या कामाबरोबर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयातील पथक पुढील दिवस चौंडीत तळ ठोकणार आहे. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती केली आहे.