रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर करावे यासाठी ग्रामस्थ व व्यापारी यांचा उपोषणाचा इशारा
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथगतीने सुरू आहे. यामुळे नागरिक, व्यापारी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. येत्या चार दिवसांत शहरातील काम सुरू झाले नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा व्यापारी व ग्रामस्थ यांनी दिला आहे. तसे निवेदन तहसीलदार गणेश माळी यांना दिले आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून तसाच खुला सोडण्यात आला आहे. बीड रोडवर मोठ्या प्रमाणात खडी टाकून ठेवण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.यासंदर्भात जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना, सचिव शरद शिंगवी, उद्योजक आकाश बाफना, पिंटूशेठ बोरा, अभय शिंगवी, प्रफुल्ल सोळंकी, आनंद बाफना आदी नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,५४८डी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कामामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुकानांमध्ये धूळ जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी वर्ग, शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी स्थानिक स्वार्थी गटांकडून ठेकेदारांना कामात अडथळा आणल्याचे देखील समोर आले आहे.
या सर्व परिस्थितीला कंटाळून शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या २८ एप्रिल २०२५ रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असून, त्याआधी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी नालीचे काम सुरू करून रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील व्यापारी तथा जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी शरद शिंगवी व युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या पुढाकाराने साधारण १५० व्यापाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. आता तरी ठेकेदाराला घाम फुटतो का हे पाहणे आवश्यक आहे.