खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाने कोणाचे काय मिटले, अवैध धंदे परिस्थिती जैसे थे, आता खासदार गप्प का?

0
598

जामखेड न्युज——

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाने कोणाचे काय मिटले, अवैध धंदे परिस्थिती जैसे थे, आता खासदार गप्प का?

अहिल्यानगर लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी जुलै २०२४ मध्ये जिल्ह्यातील अवैद्य धंधांविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनानंतर असे वाटत होते की आता अ नगर जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे उच्चाटन होईल मात्र अजूनही पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोरात सुरू आहेत.खा. निलेश लंके यांनी उपस्थित केलेल्या कॅफे, अवैध गुटखा, मावा आणि लॉजचे धंदे अजूनही सुरू असून या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही अथवा पोलीसही यांच्यावर कारवाई करताना दिसत नसल्याने आजही हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

मोठा गाजावाजा करून अवैध धंद्यांविरोधात तीन दिवस उपोषण करत लेखी पत्रानंतर चौथ्या दिवशी उपोषण मागे घेतले होते. पण ज्या गोष्टी विरोधात उपोषण केले होते त्या गोष्टी राजरोस पणे सुरूच आहेत मग उपोषण कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून कोणाचे कोणते प्रश्न मिटले, कोणाला काय फायदा झाला. जिल्ह्यातील प्रश्न लोकसभेत मांडून ते सोडविण्यासाठी खासदार असतात पण अवैध धंद्यांविरोधात उपोषण सुरु होते चौथ्या दिवशी मागे घेतले जाते. परत काही दिवसात जैसे थे परिस्थिती होते मग खासदार गप्प का बसतात यातून कोणाचे काय मिटले असा प्रश्न सर्व सामान्य जनता विचारत आहे.

मावा आणि गुटखा या मुळे तरुणाई कॅन्सर सारख्या रोगाच्या विळख्यात गुरफटत चालली असून त्याचबरोबर कॅफे आणि लॉजमुळे शाळा कॉलेजमधील मुलं शिक्षण सोडून कॅफे आणि लॉजवर जाताना दिसत आहेत अक्षरशः शाळा आणि कॉलेजच्या ड्रेसवर मुलं मुली लॉजवर आणि कॅफेमध्ये जाताना चे चित्र अ नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दिसून येत आहे.

जुलै २०२४ मध्ये उपोषणावेळी खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार मावा, गुटखा यांच्यापासून पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता मिळतो तर लॉज आणि कॅफेमधूनही मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल केले जातात असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला होता.

मात्र तीन दिवसाच्या उपोषणानंतर आता हे सर्व अवैध धंदे बंद होतील असे वाटत असताना अवैद्य धंद्यावाल्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही लॉज, गुटखा, मावा आणि कॅफे हे सर्रास सुरू आहे त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी उपोषण करूनही काही उपयोग झाला नाही का? असा प्रश्न आता समोर येतोय.

निलेश लंके यांनी पाठवले होते मुख्यमंत्र्यांना पत्र  

खासदार लंके यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून अ नगरची ओळख झाली आहे. शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन क्लब, अवैध वाळू उपसा, गुटखा, अवैध दारू विक्री, मटका, चंदन तस्करी, बिंगो यांसारखे व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे त्याला अभय आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते वसूल करत सामान्य लोकांना वेठीस धरतात. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सराफ व्यापाऱ्यांकडून पैसे उकळतात, असे गंभीर आरोप निलेश लंके यांनी केले होते. गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश करावेत. कारवाई न झाल्यास पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे खा. निलेश लंके यांनी पत्रात म्हटले होते.

सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. मग खासदार यांच्या उपोषणाने कोणाचे काय मिटले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here