……..तर शैक्षणिक सहलींतून क्रांती होईल – लेखक मनोहर भोसले
बांधखडक,वनवेवस्ती व ढाळेवस्ती येथील विद्यार्थ्यांसह पालकांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद
केवळ वाॅटर पार्क किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाणाऱ्या सहली जेव्हा आदर्श गावे, शूरवीरांची स्मारके, ऐतिहासिक गडकिल्ले, तारांगणे, संग्रहालये तसेच अनाथाश्रमे येथे आवर्जून भेट द्यायला जातील,तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात संवेदनशीलता व ध्येयवाद निर्माण होऊन खरी शैक्षणिक क्रांती होईल. अशा सहलींतून भारताच्या गौरवशाली व समृद्ध इतिहासाचे भान आणि भविष्याची दिशा स्पष्ट होण्याबाबतची प्रेरणा अंतःकरणात स्फुरीत होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे मत प्रसिद्ध लेखक मनोहर भोसले यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी येथे व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील बांधखडक,वनवेवस्ती व ढाळेवस्ती या तीन शाळांतील विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या संयुक्त शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत आयोजित प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेजवळ असलेल्या सैनिक टाकळी येथील ‘अमर जवान स्मारक’ भेटीचे व इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकामधील ‘कठीण समय येता ‘ या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांच्या प्रकट मुलाखतीचे सहलीत आयोजन करण्यात आले होते. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक आनंदराव पाटील हे होते. यावेळी लेखक मनोहर भोसले यांनी प्रकट मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रथम सर्वांनी 18 शहीद जवानांच्या स्मारकावरती आदरांजली वाहिली. यावेळी वीरपत्नी,लढाई मधील जखमी झालेले जवान व काही आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.सत्कारात शाल व प्रेरणादायी पुस्तकासह विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली कृतज्ञता पत्रे देण्यात आली. रविवार दि.२३फेब्रुवारी ते मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांच्या काळात सहलीचे आयोजन करण्यात आले होते.सैनिक टाकळीसह भारतीय सांस्कृतिक वारसा असलेले शिल्पसमृद्ध असे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर,दत्तक्षेत्र नरसोबाची वाडी,साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर,आधुनिक विचारांसह प्राचीन भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारा कणेरी मठ,जगद्गुरू श्री.रामानंदाचार्य नरेंद्र महाराज स्थापित नाणीजधाम,श्रीक्षेत्र गणपतीपुळे,ऐतिहासिक प्रतापगड,थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ‘भिलार’ या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
तीन शाळांतील एकूण ५० विद्यार्थी,५० पालक व ५ शिक्षक यांनी सहभाग घेतला असून सहलीच्या यशस्वितेसाठी बांधखडक शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने ,वनवेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक नितीन जाधव, ढाळेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक सहदेव होडशीळ व शिक्षक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह सर्व पालकांनी विशेष परिश्रम घेतले,तर बांधखडक शाळेचे उपाध्यापक तथा संत साहित्याचे अभ्यासक ‘गवसणीकार’ मनोहर इनामदार यांनी सहलप्रमुख म्हणून मार्गदर्शन व नियोजन केले.बांधखडकच्या ग्रामविकास अधिकारी श्रीम.स्वाती पटेकर यांनी सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना नरसोबाची वाडी येथील प्रसिद्ध ‘कवठबर्फी’,सरपंच श्री. राजेंद्र कुटे यांनी ‘आईस्क्रीम’ तर श्रीम.पार्वती इनामदार यांनी पुस्तकांचे गाव भिलार येथील प्रसिद्ध ‘स्ट्राॅबेरी’ दिली.
सहलीच्या प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शकाची उपलब्धता,आधुनिक सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज निवास व्यवस्था तसेच अल्पोपहार,चहापान व भोजन यांचे नेटके व्यवस्थापन आणि ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारसा जपणारी स्थळे तसेच देशभक्ति व वाचनसंस्कृती जपणारी आदर्श गावे यांचा शैक्षणिक सहलीत समावेश केल्याने आनंद व प्रेरणा देणारी जीवनातील अविस्मरणीय सहल अनुभवल्याची भावना सर्व विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली.