जामखेड महाविद्यालयात अनोखा उपक्रम ” पुस्तक माझा पांडुरंग “
‘पुस्तक आपल्या भेटीला’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणजे ‘पंढरीचा पांडुरंग’. या लोकदैवताचा भक्तीसोहळा म्हणजे आषाढी वारी.! सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणांहून वारकरी दिंडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अशा भक्तीमय काळात जामखेड महाविद्यालयाने एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचाच पांडुरंग म्हणजे ‘पुस्तके’. याची जाणीव ठेवून ‘पुस्तक माझा पांडुरंग’ याचे भान पुन्हा समाजमनावर बिंबवण्याचा हेतू ठेवून जामखेड महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, वाङमय मंडळ, सर्व भाषा विभाग यांच्या पुढाकाराने ‘पुस्तक आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वारीच्या भक्तीसोहळ्यासोबतच ज्ञानाचा पुस्तक सोहळा आयोजनाची भन्नाट कल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल जी. पुराणे यांनी मांडली आहे. यासाठी त्यांना दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीपशेठ गुगळे, सचिव अरुणशेठ चिंतामणी आणि सर्व मान्यवर संचालक मंडळाचे या उपक्रमाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले आहे.
सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. उध्दवराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर आठवडाभर विविध महत्वपूर्ण पुस्तके, दुर्मीळ ग्रंथ, साप्ताहिकाचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे.
ग्रंथप्रदर्शन, पुस्तक कट्टा, कवीकट्टा, पुस्तक चर्चा, लेखक परिचय अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या कालावधीत होणार आहे.
जामखेड शहर आणि परिसरातील शाळा, विविध कार्यलये, वाचनप्रिय नागरिक यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ पुराणे यांनी केले आहे.