जामखेड न्युज——
बांधखडक शाळेचे क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश
खो-खो लहान गट मुले व मुलींचा संघ जामखेड तालुक्यात प्रथम,जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असते.याच हेतुने शासनातर्फे विविध गुणदर्शन तसेच क्रीडा स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते.जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मधील जामखेड तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच सोमवार दि.१० फेब्रुवारी२०२५ रोजी ल.ना.होशिंग माध्य.व उच्च माध्य.विद्यालय आणि जामखेड महाविद्यालय येथील भव्य प्रांगणात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत नायगाव केंद्रातील जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथील मुले व मुली या दोन्ही संघांनी लहान गटात प्रत्येकी चार राऊंड जिंकत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
बांधखडक शाळेच्या इतिहासात खो-खो या क्रीडा प्रकारात मुले व मुलींच्या संघांना एकत्रितपणे जिल्हास्तरावर तालुक्याचे नेतृत्त्व करण्याची संधी प्रथमच मिळत असल्याने विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिगरबाज खेळीचे प्रदर्शन घडवत ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल तालुक्याचे तहसिलदार मा.श्री.गणेश माळी, पोलीस निरीक्षक मा.श्री.महेश पाटील, गटविकास अधिकारी मा.श्री.शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विजय शेवाळे, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षक बंधुभगिनी तसेच बांधखडक येथील सर्व पालक,शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ आणि समस्त ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याने लहान गटातील मुले व मुली या दोन्ही संघांची जिल्हास्तरावर निवड झाली असून शनिवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री.दा.ह.घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत.सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्या.विकास सौने व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.