सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई होणारच
सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खातात असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महायुतीचं सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतल्याचं सांगत फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) येथे दिली. आष्टी उपसा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन’ कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, विधिवत पूजन करून तसेच रिमोटद्वारे कळ दाबून बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. आमदार सुरेश धस यांच्याकडून भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे असं धस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्याला जलसंधारण खातं मिळालं. त्यावेळी सुरेश धस मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर अगदी मागेच लागायचे. ते सातत्याने पाठपुरवठा करायचे. सुरेश धस मागे लागले की डोके खावून टाकतात.”
मराठवाड्याचा दुष्काळ आता भूतकाळ होणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठवाड्याला कृष्णा खोरेचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे आणि मराठवाड्याततील अनेक नेत्यांनी केला. पण दुर्दैवाने ते सगळे काम पूर्ण झाले नाही. 23 टीएमसी पाण्यापैकी केवळ 7 टीएमसी पाणी सापडले. या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे. जो पर्यंत पश्चिमी वाहिन्यांचे पाणी, थेट समुद्रात जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणीत नाहीत तोपर्यंत मराठवाडा दुष्काळ मुक्त होणार नाही. त्यासाठी गोदावरीच्या एकात्मिक आराखडा बनवला आहे. त्या माध्यमातून 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले पाहिजे.”
या संदर्भात 2019 साली आपण जीआर काढला. मात्र नंतर सरकार गेल्याने यावर कारवाई झाली नाही असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, “मी माझे भाग्य समजतो पुन्हा माझ्यावर जलसिंचनची जबाबदारी आली. या प्रकल्पाचे सगळे अडथळे दूर केले. येत्या वर्षभरात नदी जोड प्रकल्पाचा काम सुरू करू. त्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी वाढणार आहे. त्यानंतर जायकवाडीमधून पाणी इकडे आणू.”
मराठवाड्याच्या दुसऱ्या पिढीला दुष्काळ बघू द्यायचा नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यातील सगळ्या उपसा सिंचन योजना आपण सोलर वर टाकत आहोत. ही योजना सुद्धा सोलरवर चालणार आहे. आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून आम्ही स्वतंत्र योजना बनवली असून एकूण 16 हजार मेगावॉट वीज सोलर मधून वीज मिळणार आहे. या पुढे 8 रुपये ऐवजी ही वीज फक्त तीन रुपये युनिटने पडणार आहे.”
संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सगळ्यांवर कारवाई होणार. या ठिकाणी सगळ्यांना गुण्या गोविंदाने राहायचे आहे. आपण नवीन बीड तयार करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बीडच्या आष्टीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आमदार सुरेश धस यांनी जोरदार बॅटिंग केली. बीडची बदनामी कोण करतंय, यावर देखील धस यांनी भाष्य केलं. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांनी कशी सहकार्याची भूमिका घेतली यांचे धस यांनी दाखले दिले. मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद है, अशी डायलॉगबाजीदेखील धस यांनी यावेळी केली.