महामार्गालगतची अतिक्रमणे निघणार – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

0
1090

सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील.

तोडलेल्या रस्ता दुभाजकांची दुरूस्ती करण्यात यावी. दुभाजक तोडणाऱ्या संबंधित पेट्रोल पंप चालक अथवा आस्थापना मालकावर कारवाई करावी. वाहतूक सुरक्षेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात यावी.

नेवासे आणि इमामपूर येथील अपघातप्रवण भागात आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. किशोरवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत जनजागृती करण्यात यावी. शाळांमधून पालकांना याबाबत सूचना देण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेबाबत परिसर संस्थेतर्फे सादरीकरण करण्यात आले. यातील अधिक गंभीर ब्लॅक स्पॉटबाबत तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीत शासकीय आणि अशासकीय सदस्यांनी रस्ता सुरक्षेबाबत विविध सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here