शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवा – आमदार सत्यजित तांबे

0
269

जामखेड न्युज——

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवा – आमदार सत्यजित तांबे

 

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान आ. तांबे यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा करून समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन दिले. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व मुद्द्यांवर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले असून या सर्व प्रश्नांसाठी एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त मान्यताप्राप्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

त्याचसोबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, बंद असलेली शिक्षक व शिक्षकेतर भरती सुरू करणे, वैद्यकीय बिलासाठी कॅशलेस सुविधा देणे असे प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे वेतन हे वेळेवर होत नसल्याने त्यांचे वेतन नियमित होण्यासाठी वेळेवर अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. तांबे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी व मार्च 2025 परिक्षांमध्ये नियुक्त पर्यवेक्षक/केंद्र संचालक यांच्या आंतरबदलाचा निर्णय रद्द करावा.

त्याचबरोबर शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इ. 10 वी मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत 30 दिवसांनी वाढविणे व शासन निर्णय दिनांक 24 नोव्हेंबर 2017 मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.

 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील शिक्षकांना 10, 20 व 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे. राज्यातील ग्रंथपालांच्या कालबद्ध वेतनश्रेणीसंदर्भात शासन परिपत्रकात दुरुस्ती करणे. यासह इतरही महत्त्वपूर्ण मागण्या आ. तांबेंनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या समोर मांडल्या.

राज्यपालांची देखील घेतली होती भेट
राज्यातील विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत आ. सत्यजीत तांबे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा करून समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन दिले तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. आणि राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती आ. तांबेंनी राज्यपालांना केली होती

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here