बीडच्या लेकींनी देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली

0
468

जामखेड न्युज——

बीडच्या लेकींनी देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली

मागच्या एक दिड महिन्यापासून जिल्ह्याची चर्चा होतेय ती केवळ वाईट अंगानेच बीड म्हणजे दहशतीचे केंद्र असे काहीसे चित्र राज्यभरात निर्माण झाले आहे. मात्र हे सारे होत असताना बीडचे नाव अभिमानाने घ्यावे अशा काही घटनाही घडल्या. बीडच्या प्रतीक्षा इंगळे हिच्या कर्णधार पदाखाली भारताने खोखोचा विश्वचषक जिंकला. बीडच्याच दामिनी देशमुखची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. असे अभिमान वाटावे असे प्रसंग अजूनही आहेतच, त्याची चर्चा होणार कधी? खरेतर अशांचे अभिनंदन होऊन ही बीडची ओळख म्हणून समोर यायला हवे.

बीड जिल्हा हा राज्यातला खऱ्या संघर्ष शिकविणारा,मेहनत शिकविणारा जिल्हा होता. तीच बीडची ओळखहोती. अध्यात्मिक संप्रदायात विविध संतांच्या विचारांनी पुनीत झालेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. मात्र मागच्या काही काळात विकासाच्या संकल्पनेवर सारे चेहरे रंगविले जाऊ लागले आणि बीड जिल्हा म्हणजे मागास जिल्हा, ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा अशी ओळख बीडकर म्हणून आम्ही आणि आमचे लोकप्रतिनिधीच मिरवू लागले. ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा हे बीडचे एक अंग आहे, नाही असे नाही. 

मात्र केवळ तीच बीडची ओळख नाही तर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.

प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा ३८ गुणांच्या फरकाने पराभव करीत विश्वचषकावर आपले नाव कोरले. तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रियंका इंगळे हिचे व आणि भारतीय महिला खो-खो संघाचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले.

वडमुखवाडीत लहानपण
प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे लहानाची मोठी झाली. तिने प्राथमिक शिक्षण श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे पूर्ण केले, जिथे तिला खो-खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रियंकाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सातवीत असतानाच तिने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.
अशा प्रकारे दोन बीडच्या लेकींनी देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here