भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ
जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.
राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.
राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.
राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.