दोन वर्षापासून रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गामुळे अनेकांना मणक्याचे आजार तर गाड्या खिळखिळ्या, धुळीने श्वसनाचे विकार

0
533

 जामखेड न्युज——

दोन वर्षापासून रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गामुळे अनेकांना मणक्याचे आजार तर गाड्या खिळखिळ्या, धुळीने श्वसनाचे विकार

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी ह्या १३ कि. मी. रस्त्याच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील परंतु अद्याप ५० टक्के काम बाकी आहे. अठरा महीन्याचा कालावधी यासाठी होता. अपूर्ण कामामुळे दोन वर्षांपासून शहरवासीयांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी, ठेकेदार व पुढारी यांच्या कात्रीत हा महामार्ग अडकला आहे. या महामार्गाच्या कामावरून लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खासदार आमदारात रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती.  आता दोन वर्षे होत आले तरीही पन्नास टक्के काम पूर्ण नाही. यामुळे अनेकांना मणक्याचे आजार तर गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. धुळीने श्वसनाचे विकार जडले आहेत. धुळ होऊ नये म्हणून पाणी टाकले जाते या पाण्यामुळे रस्त्यावर खाचखळगे झाले आहेत यामुळे गाडी चालवणे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

श्रेयवाद जसा रंगला तसा अपूर्ण कामाचे श्रेय घेण्यासाठी कोणी पुढे येईना. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर ठेकेदाराने मुदतवाढ मिळावी म्हणून राष्ट्रीय महामार्ग अधिका-याकडे मागणी केली आहे. त्यामुळे अधिकारी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.       

 जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग बाफना पंचदेवालय ते सौताडा हद्द असा १३ कि. मी. चा चारपदरी काँक्रीट रस्ता आहे. यामध्ये डिव्हाडर स्टेट लाईट, फुटपाथ, पुल समाविष्ट असून यासाठी १५० कोटी रुपये अंदाजपत्रक होते. काम मिळण्यासाठी ठेकेदाराने कमी दराने टेंडर भरले होते.  फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन खासदार सुजय विखे व आ. राम शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोठा गाजावाजा केला होता.     

        अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी होता. सदर ठेकेदाराने उपठेकेदार नियुक्त केले होते. सुरवातीला कामाने वेग घेतला नंतर या उपठेकेदाराने काम सोडले. नंतर ठेकेदाराने काम सुरू केले. परंतु पैशाअभावी कामाचा वेग मंदावला तसेच शहरातील रस्त्याचे दोन्ही बाजुचे अंतर कमी व्हावे म्हणून रस्त्यांवरील दुकाने व घरे असणारे कोर्टात गेले. परंतु काम बंद ठेऊ नये असा कोर्टाचा आदेश नव्हता. कोर्टाने भुमिअभिलेख, नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी रस्ता मोजून घेऊन रस्ता करण्यास सांगितले परंतु राष्ट्रीय महामार्गाचे तत्कालीन अधिकारी यांनी वेळकाढू पणाचे धोरण घेतले. यामुळे संथ गतीने काम होत गेले अर्धवट कामामुळे मोठ मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत.     

सध्या खर्डा चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत कसलेही काम झाले नाही. विश्वक्राती चौक ते बैल बाजार प्रवेशद्वारापर्यंत एकच बाजू झालेली आहे. पुढे हाॅटेल रघुनंदन पर्यंत तेथून पुढे सौताडा पर्यंत पुलाचे कामे झालेली आहेत रस्ता खोदून मुरूम टाकलेला आहे रस्त्यावर खाचखळगे व फुफाटा यामुळे वाहनधारकांना व शेजारी नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे सुरू झाले आहेत. दीड वर्षाची मुदत संपली तरी अद्याप निम्माही रस्ता पुर्ण झालेला नाही. शहरात खर्डा चौक ते बाजार समिती पर्यंत काम अपुर्ण आहे. यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.       
   चौकट
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून काम बंद आहे. ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठेकेदाराने मुदतवाढ मिळावी म्हणून विनंती अर्ज सहा महिन्यांपूर्वी केला आहे. आता चार दिवसांत काम सुरू करण्यात येईल असे ठेकेदारांने सांगितले आहे. मशिन आल्या आहेत. लवकरच काम सुरू होईल.
लोभाजी गटमळ – सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here