जामखेड न्युज – – – –
रेल्वेमार्गाशिवाय उत्तर नगर जिल्ह्यातून केंद्र सरकारचे आणखी दोन महत्त्वाकांक्षी रस्ते जात आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तालुक्याच्या उत्तरेकडून- कोपरगाव तालुक्यातून सिन्नरमार्गे थेट ठाणे जिल्ह्यातील शहापूरला जाणारा मुंबई ते नागपूर हा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमधून साकारत असलेला ९८.५ किलोमीटर लांबीचा सुरत- हैदराबाद (ग्रीन फिल्ड अलाइनमेंट) हा सहा पदरी राष्ट्रीय महामार्गही उत्तर नगर जिल्ह्यातून, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, वडझरी, लोहारे, कासारे आदींसह १३ गावांमधून जाणार आहे.
या महामार्गासाठी संगमनेरसह राहात्यातील पाच, राहुरी १८ व नगर १३, अशा ४९ गावांतील ८२५ हेक्टर क्षेत्राचे संपादन होत आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे दुष्काळी भागातील गावांचा भविष्यात कायापालट होणार आहे. शहरातून दक्षिणोत्तर जाणारा नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील दोडीजवळ छेदणार आहे, तर कोपरगाव तालुक्यातून जाणारा सुरत- हैदराबाद महामार्ग काकडी विमानतळाजवळून जाणार असल्याने, उत्तर नगर जिल्ह्यात दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्गामुळे तयार होणाऱ्या आभासी त्रिकोणाच्या माथ्यावर काकडी विमानतळ असून, संगमनेर स्थानकापासून हे अंतर केवळ २५ किलोमीटरवर येणार आहे. शहराजवळ पाच किलोमीटर अंतरावरील रेल्वेस्थानकापर्यंत संगमनेरच्या दिशेने शेतमालासाठी गोदामे, छोटी-मोठी दुकाने, कार्यालये व इतर व्यापारी आस्थापना वाढल्याने समनापूरपासून लोणीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नवीन उद्योग-व्यवसाय विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवाय, पुढील काळात समनापूर व वडगाव पान ही जवळची दोन गावे उद्योगाचे हॉट स्पॉट होणार, यात शंका नाही. त्यामुळे भविष्यात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील क्रयशक्ती असलेल्या व्यापारी व शेतकरी वर्गाची संगमनेर बाजारपेठेत उलाढाल वाढल्याने, संगमनेरच्या बाजारपेठेत चलन फिरणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक व व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या सर्व मार्गांमुळे उत्तर नगर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. मात्र, राजकीय व प्रशासकीय दिरंगाईमुळे दीर्घ काळ रेंगाळलेल्या निळवंडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्याने, कोणत्याही अडथळ्याविना हे काम पूर्ण होऊन, याची देही याची डोळा संगमनेरसह इतर भागांचा उत्कर्ष पाहण्याची इच्छा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. या सर्व मार्गांमुळे वाहतुकीच्या सुविधा वाढल्याने संगमनेरकडे नारायणगाव, ओतूर, आळे फाटा या भागातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात संगमनेरची बाजारपेठ निश्चितच अधिक समृद्ध होण्यास मदत मिळेल.