जामखेड न्युज – – –
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, असं अनेक वेळा म्हटलं जातं. तसंच काहीसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी प्रत्येक पावलावर उद्धव ठाकरे यांना साथ दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.
शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.
विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न नेमकं कसं झालं किंवा त्यांची पहिली भेट कशी झाली हे फार कमी जणांना माहित आहे, त्यामुळे चला तर जाणून घेऊयात त्यांच्या पहिल्या भेटीविषयी.
रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लग्नाआधीचे त्यांचे आडनाव पाटणकर आहे. ८० च्या दशकात मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली.
रश्मी ठाकरे १९८७ साली एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण आहे.जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली.
उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. ते फोटोग्राफी करायचे. त्यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. नंतर १३ डिसेंबर १९८८ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. अशी माहिती एका मित्राने दिली.
“रश्मी ठाकरे या मूळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वत:ला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात” अशी माहिती त्यांचे काका दिलीप श्रृंगारपुरे यांनी दिली. रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांचा प्रभाव आहे. “रश्मी यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांबरोबर दृढ नाते आहे. कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही” असे श्रृंगारपुरे यांनी सांगितले.
रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.