सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

0
1212

जामखेड न्युज——

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आठ आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर मात्र अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान यातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची माहिती मागवली जातेय. हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जातेय. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली आहे.

या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहाही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर 2019 मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.

महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
जयराम माणिक चाटे हा 21 वर्षाचा असून त्याच्यावर 2022 ते 24 या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

प्रतीक भीमराव घुले हा 24 वर्षाचा तरुण असून त्याच्यावर 2017 ते 24 या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून 2020 ते 24 या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात 2024 मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे.
तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
मोक्का कधी लावला जातो?
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
कोणावर मोक्काची कारवाई होते ?
हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here