सरपंच देशमुख हत्याकांडातील आरोपींचा एन्काऊंटर करा, मोठे बक्षीस मिळवा
शेतकरी कल्याण बाबर यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे एकच खळबळ
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्यांना माढ्यातील शेतकऱ्यांने मोठ्या बक्षिसाची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.
माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा करताना तसे प्रतिज्ञापत्र केले आहे. हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचेही कल्याण बाबर यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत संतोष देशमुख हत्येवर उत्तर देणार आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत. या हत्येतील मुख् सूत्रधार अजून बाहेर असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत लावून धरला आहे. यात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तसे आरोप विधानसभेत होत आहे. वाल्मिक कऱ्हाड याला अटक करण्यासाठी विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण तापलेले असताना माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी आरोपींचा एन्काऊंटर करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करून खळबळ उडवून दिली. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवेल अथवा एन्काऊंटर करेल, त्या पोलिस (Police) अधिकाऱ्यांना 51 लाखांचे बक्षीस कल्याण बाबर यांनी जाहीर केले. याशिवाय 5 एकर जमीन देखील देणार आहे.
कल्याण बाबर यांनी या बक्षिसाबरोबरच मुख्य सूत्रधारास अटक केल्यास अधिकाऱ्याला 2 लाख रुपये रोख देण्यात येतील, असे देखील कल्याण बाबर यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेले तरी याप्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक नाही.
शेतकरी कल्याण बाबर यांनी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालकांना पाठवले आहे. कल्याण बाबर यांच्या या प्रतिज्ञापत्रामुळे खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांविरोधात संताप आहे. गुन्हा हा गुन्हाच असतो. तो सत्ताधाऱ्यांचा, असो की विरोधकांचा. गुन्हेगारांची दहशत संपली पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कल्याण बाबर यांनी व्यक्त केली.