मागील २९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापती पदी प्रा.राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही.
१९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे प्रा.राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.
७ जुलै २०२२ रोजी रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यापासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असला तरी अद्यापही खातेवाटप झालेले नाही.
शिंदेसेनेकडून काही महत्त्वाच्या पदांची मागणी करण्यात आली होती. त्यात विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा देखील समावेश होता. जर विधानपरिषदेचे एकूण गणित बघितले तर भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने राम शिंदे यांचे नाव लावून धरले. राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यक्रमानुसार बुधवारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक होते. शिंदे यांनी सकाळी अर्ज दाखल केला. मात्र मविआने उमेदवार न देण्याची भूमिका घेतली. यामुळे आमदार प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
चौकट लोकशाहीमध्ये विरोधकाला सुद्धा अपेक्षा असते की सभापतीने आपलं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे. बिनविरोध सभापतीपदाची नेमणूक होणं हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचे मत भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केलं. अधिकृत रित्या माझी उद्या राज्यपालांच्या संदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड होईल असे राम शिंदे म्हणाले.