बिबट्याचे लक्ष वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यावर, भुतवडा परिसरात गाय फस्त
जामखेड परिसरात भीतीचे वातावरण
जामखेड परिसरात भुतवडा, सौताडा, मोहा, साकत, पिंपळवाडी परिसरात बिबट्याला अनेक लोकांनी पाहिले आहे. दि १० रोजी रात्री राजेंद्र कोठारी यांच्या शेतात भुतवडा तलावाजवळ रात्री 3 बिबटे आले होते. कोठारी यांच्या गाय गोठ्यातील एका गायीला बिबट्यांनी मारले आहे. मृत गायीची अवस्था पाहून अनेकांच्या मनात भीतीचा गोळा येत आहे. तीन बिबटे आहेत असे सांगितले जात आहे.
या ठिकाणी आणखी ३० गाया गोठ्यात आहेत. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे फार भीती निर्माण झाली आहे. शेजारी असलेल्या चार वस्तीतील लोक सकाळी ८ वाजेपर्यंत घराबाहेर आले नव्हते. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी सांगितले.
या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वनविभागाचेआधिकारी तसेच तहसीलदार यांना तातडीने फोन करून माहिती दिली. घटना गंभीर असून तातडीने सुरक्षेचे पावलं उचलण्याची विनंती केली तसेच ताबडतोब माणसं पाठवावेत सदर घटनेचा पंचनामा करून घ्यावा अशी विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यासह शहरा जवळील काही भागात बिबट्या अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याबाबत संबंधित प्रशासनालाही माहिती आहे. संबंधित वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या मागावर आहेत. जामखेड तालुक्यात साकत, भूतवडा,सावरगाव, लेहनेवाडी, धोत्री, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला अनेक ठिकाणी लोकांनी पाहिले आहे. वनविभागाच्या जिल्हा पातळीवरील आधिकार्यांनी लक्ष घालून बिबट्या पकडण्याचे पिंजरे व प्रशिक्षित कर्मचारी स्टाफ जामखेडला पाठविण्याची गरज आहे. तातडीने वनविभागाने याची दखल घ्यावी. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी व येण्या जाण्यासही भीती वाटत आहे. जामखेड परिसरातील नागरिक फार मोठ्या भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.
गेल्या वर्षी जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. तसेच धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर महिन्यांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.
चौकट
नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.