रोहित पवारांना आत्मपरीक्षणाची गरज, आमदार प्रा राम शिंदे यांची कडवी झुंज, दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांमुळेच अडचण
रोहित पवारांना अपक्ष रोहित पवाराने फोडला घाम
जामखेड – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत आ. रोहित पवार यांनी आज. राम शिंदे यांचेवर अवघ्या 1243 मतांनी विजय मिळवला. पवारांसाठी हा विजय आत्मपरीक्षण करणारा ठरला तर आ. राम शिंदेना भूमिपूत्र नाराची सहानुभूती तारू शकली नाही. रोहित पवार व त्यांच्या कुटुंबियांनी केवळ निवडणुकी पुरती नव्हे तर पाच वर्षे मतदारांशी असलेली नाळ कायम ठेवून मतदाराच्या नजरेत भरतील असे विविध विकासकामे कामे केली पण महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विकासकामे झाकाळली. नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष रोहित पवार उमेदवाराने साडेतीन हजार मते घेऊन आ. पवार यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झुंजावे लागले.
दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांमुळेच अडचण निर्माण झाली एका उमेदवारांने अजिबात कार्यकर्ते सांभाळले नाहीत तर एका उमेदवारांने कार्यकर्ते जास्तच सांभाळले यामुळे दोन्ही उमेदवारांना अडचण आली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आ. रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची लढत महाराष्ट्रासाठी लक्षवेधी होती. २०१९ विधानसभा निवडणुकीसाठी मतदार संघातील एकही उमेदवार विद्यमान आमदार व मंत्री असलेले राम शिंदे यांना टक्कर देणारा नव्हता. त्यावेळी ह्याच मतदार संघातील सर्व विरोधकांनी पवार घराण्यातील रोहित पवार यांना पुढे करून मतदारसंघात परिवर्तन करून भाजपचा 25 वर्षाचा बालेकिल्ला उध्दवस्त केला होता. यानंतर आमदार झालेल्या रोहित पवारांनी मतदारसंघात पाय रोवले व विकासाचा मॅप कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून तयार केला व योगायोगाने राज्यात सत्ता आली या सत्तेचा फायदा घेऊन मतदार संघात विकासाची गंगा आणण्यास सुरुवात केली.
कोवीडच्या काळात विकासकामे प्रलंबित पडले. अडीच वर्षांतील सत्ताबदल व राष्ट्रवादीतील फुट हे दोन घटना रोहित पवार यांच्या राजकीय जीवनावर परिणामकारक ठरल्या व त्यांच्या स्वभावात बदल होत गेला. परिणामी पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्ते दुरावत चालले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला नाही त्यामुळे ते विरोधात गेले. त्यांच्या बरोबर तडजोड न करता सुपारीबाज विशेषण लावून पराभव ओढून घेण्याचा प्रयत्न आ. रोहीत पवारासाठी अंगलट आला होता. त्यातच रोहित पवार यांचा नाम साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवाराने चकवा दिला. त्यांच्या नाव व पिपाणी चिन्हाने साडेतीन हजार मते घेऊन आ. पवार यांना पराभवाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला.
आ. राम शिंदे यांनी मराठा समाजाचे ताकदवान नेते कार्यकर्ते यांना ताकद दिली. भूमिपूत्राचा नारा व आपला तो आपलाच असतो हा मुद्दा प्रभावी केला तसेच महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणून सरसकट दिड हजार महिना चालू केला व त्यांच्या खात्यात जवळपास सहा सात हजार रुपये जमा केले यामुळे महिलांना हे सरकार आपले वाटू लागले. लाडक्या बहिणीचे जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे आ. राम शिंदे यांनी घेऊन महिला मतदार फिक्स करून निवडणूकीत चुरस वाढवली. दोन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बील माफ, महिलांसाठी एसटीने अर्धे तिकिटात प्रवास व कांद्याचे भाव स्थिर ठेवले. याबाबत मोठी जनजागृती केली. तसेच सरकारच्या माध्यमातून रस्त्यासाठी व विविध विकास कामांसाठी निधी आणला त्याचा प्रचार व प्रसार करून वेगळी प्रतिमा निर्माण केली यामुळे आ. राम शिंदे निवडून येणार असे वातावरण तयार झाले होते. दोन्ही उमेदवारांनी यावेळी साम – दाम – दंड – भेद या नितीचा वापर केला.
वरील स्थिती पाहता आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्यात चुरशीची लढत होणार हे निश्चित होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला तो ७५.१५ टक्के झाला. यामुळे कोण निवडून येईल याबाबत अंदाज वर्तविणे कठीण झाले होते. येणारा उमेदवार काही मतांनी येईल असा अशी शक्यता निर्माण झाली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत रोहित पवार यांनी आघाडी घेतली ती काही काळ टिकली यानंतर राम शिंदे पुढे राहिले. प्रत्येक फेरीचा निकाल उत्कंठावर्धक ठरला कधी रोहित पवार पुढे तर कधी राम शिंदे पुढे. यामुळे दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती. शेवटची २६ वी फेरी आ. रोहित पवार यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. टपाली मतदानात रोहीत पवार यांना ५५५ मताची आघाडी मिळाली अखेर अटीतटीच्या लढतीत बारा तास चाललेल्या मतमोजणीत रोहित पवार यांनी १२४३ मते घेऊन विजयी झाले. आ. रोहित पवार यांच्या विजयाने मोठा जल्लोष करण्यात आला.
चौकट आ . रोहित पवार नतमस्तक ————————————— आ. रोहित पवार निवडून आल्यानंतर मिडीयाशी बोलताना म्हणाले निवडणुकीच्या काळात मला सर्व कार्यकर्ते, युवा वर्ग, महिला, नागरिक तसेच माझे आईवडील, पत्नी या सर्वांनी माझ्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. माझ्याकडून चुकून, जाणते-अजाणतेपणाने कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाविषयी चुकीचा किंवा अपशब्द वापरला गेला असेल, काही चुकीची कृती घडली असेल किंवा कुणाचा अवमान झाला असेल तर या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि विजयाबद्दल आभार न मानता कायमच कर्जत-जामखेडकरांच्या ऋणात राहणं मला आवडेल असे आमदार रोहित दादा म्हणाले!
चौकट फेरीतील आघाडी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष, निराशा ———————————————— मतमोजणीतील प्रत्येक फेरीचा निकाल बाहेर येताच दोन्ही बाजुचे कार्यकर्ते मताधिक्य पाहून जल्लोष करीत होते. गावोगावी फटाके व डिजेच्या मिरवणूकीची तयारी केली गेली होती. एखाद्या फेरीचा निकालाला वेळ लागल्यास सोशल मीडियावर फेक मेसेज मताधिक्याची होत असल्याने मिरवणूक काढली गेली. शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठावर्धक राहिल्याने अनेक गावात आपलाच विजय झाला या भूमिकेने मिरवणूक काढली जायची खरा निकाल कळताच मिरवणूक व फटाके बंद व्हायची यामुळे कार्यकर्ते संभ्रमात राहिले होते. काही कार्यकर्त्यांची जल्लोष करित असतांनाचं निकाल समजल्यावर निराशा झाल्याचे चित्र दिसून आले . चौकट कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघातील* उमेदवारांना मिळालेली मते
१ ) रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी शरद पवार) – १२७६७६ 2 ) राम शंकर शिदे (भाजपा) –१२६४३३ 3 ) दत्तात्रय सोनवणे (बसपा) -५९१ ४ ) करण प्रदीप चव्हाण -७१८ ५ ) राम प्रभू शिंदे -१४५ ६ ) सोमनाथ हिराभाऊ भैलूमे -१२३५ ७ ) राम नारायण शिंदे -३८५ ८ ) रोहित चंद्रकांत पवार -३४७४ ९ ) शिवाजी विश्वनाथ उबाळे -६०५ १० ) सतीश शिवाजी कोकरे -१६१ ११ ) हनुमंत रामदास निगुडे -४७६ १ २ ) नोटा -५८४
चौकट फेर मतमोजणीची मागणी फेटाळली मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. रोहित पवार यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी केल्यानंतर राम शिंदे यांची फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र ती नाकारली, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. चौकट बेट्या.. थोडक्यात वाचला अजित पवार ——————————————– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावरून दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार निघाले असता त्यावेळी आ. रोहीत पवार जात असताना काका पुतण्याची समोरासमोर भेट झाली असता अजितदादा म्हणाले बेट्या.. तू थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झाले असत..चल पाया पडत असे रोहीत पवार यांना म्हणताच रोहीत पवार हे अजित पवार यांच्या पाया पडले हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे जनतेत काका पुतण्याची विधानसभा निवडणुकीसाठी खेळी होती अशी चर्चा रंगली आहे. चौकट दादा कटात सहभागी राम शिंदेना अश्रू अनावर ———————————————————- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार कराड यांनी रोहीत पवार यांच्या बरोबर झालेल्या संवादाने आ. राम शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दादा यांना माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी निमंत्रण दिले पण ते मुद्दाम आले नाही. माझ्या विरोधात हा नियोजीत कट होता. रोहीत पवार व त्यांचे कुटुंबसुध्दा बारामतीला मतदानाला गेले नाही. महायुतीचा धर्म अजितदादा यांनी पाळला नाही. माझा बळी देण्याचा प्रयत्न झाला यावेळी राम शिंदे यांना अश्रु अनावर झाले. ते पुढे म्हणाले मी फेरमतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला होता तो त्यांनी स्विकारला पण त्याअगोदर त्यांनी निवडणूक आयोगाच्या बेवसाईटवर समोरचा उमेदवार विजयी घोषित केला ही त्यांची चुक आहे. याबाबत मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.