जामखेड न्युज – – –
कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे दस्तुरखुद्द अजित पवार यांनाही शक्य होत नाही, त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही उदघाटन उपमुख्यमंत्री करतात आणि उभ्या उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा आस्वादही ते घेतात. बारामतीत आज (ता. 25) घडलेला हा किस्सा.
तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आपला हक्क आपला व्यवसाय या उपक्रमाखाली फिरत्या चहा विक्रीच्या दुकानाची सुरवात केली आहे. आज महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते. त्या वेळेस तुषार यांनी अजित पवार यांना आपल्या या छोट्याशा व्यवसायाचे उदघाटन तुम्ही करावे अशी इच्छा बोलून दाखवली. क्षणाचाही विलंब न करता पवार लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ गेले, त्यांनी फीत कापून उदघाटन केले आणि त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला. तेवढ्या वेळात त्यांनी व्यवसाय व त्याच्याविषयीही चौकशी केली.
हेही वाचा: FB-इन्स्टाच्या जाळ्यात भविष्य; 10 वर्षांच्या मुलांना घातलाय विळखा
अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही, ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात व कार्यकर्त्यांचे मनही राखतात याचा प्रत्यय या छोट्याशा घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला. आपल्या दुकानाचे उदघाटन स्वताः अजित पवार यांनी केल्याचा आनंद तुषार याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा अशा सदिच्छाही जाता जाता पवार यांनी त्याला दिल्या.