पाऊसबळी १४५ वर – एक लाख ३५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

0
245
जामखेड न्युज – – – 
राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जखमी झाले. दरड दुर्घटना आणि पुरात बेपत्ता असलेल्या सुमारे शंभराहून अधिक नागरिकांचा शोध सुरू आहे, तर एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा शनिवारी ७४ वर पोहोचला. दरडी कोसळल्याने रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन आणि सातारा जिल्ह्यात १८ जणांचा बळी गेला. रायगड जिल्ह्यात ४३, रत्नागिरी जिल्ह्यात १७ आणि साताऱ्यातील २२ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
धुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये येथे गुुरुवारी संध्याकाळी दरड कोसळली. त्यातील मृतांची संख्या शनिवारी ४२ वर पोहोचली, तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे ५ आणि साखर सुतारवाडी येथे ६ जण दगावले आहेत. तळये गावातील ४३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्यांचा शोध घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावात शुक्रवारी कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर १७ बेपत्ता आहेत. तेथील सात घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, कोकणात १६ जुलैपासून अतिवृष्टीमुळे १२५ जणांचा मृत्यू, तर ५६ नागरिक जखमी झाले आहेत, तर बेपत्ता असलेल्या ६४ नागरिकांचा शोध सुरू असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या १२ दुर्घटना घडल्या. त्यांतील १८ मृतदेह शनिवारी ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई येथे शुक्रवारी रात्री १२ ठिकाणी डोंगरकडे कोसळून अनेक घरे गाडली गेली. त्यांतील २२ नागरिक बेपत्ता आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन हजारांहून अधिक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला.
*हजारो नागरिक सुरक्षितस्थळी*
खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात नदीकाठच्या गावातील ७८ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात ४१ हजार, साताऱ्यात ७ हजार, रत्नागिरीत १२००, रायगडमध्ये १०००, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२७१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ३४ तुकड्या, राज्य आपत्ती निवारण पथकाच्या सहा, तटरक्षक दलाच्या तीन, नौदल, हवाईदल, लष्कराच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
*पश्चिम महाराष्ट्र : पूरस्थिती कायम*
सांगली/कोल्हापूर/वाई : पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस कोसळलेल्या पावसाने शनिवारी उसंत घेतली. मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर कायम आहे. त्यातच धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे सांगली आणि कोल्हापूरभोवतीचा पुराचा विळखा शनिवारीही कायम होता.
*पाऊस ओसरला…तरीही अतिदक्षता*
पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर शनिवारी ओसरला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणीच आता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here