जामखेड शहरात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या १५ हॉटेल मधुन १९ गॅस टाक्या जप्त
महसूल व पुरवठा विभागाची धडक मोहीम
जामखेड शहरासह तालुक्यात गॅस टंचाई च्या पाश्वभूमीवर घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी महसूल व पुरवठा विभागाने धडक मोहीम राबवत हॉटेल व धाबे अशा पंधरा ठिकाणाहून १९ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जामखेड चे तहसीलदार धनंजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पुरवठा अधिकारी जालिंदर कदम यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळे पथके तयार करण्यात आली असून सध्या ज्या ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत आहे तेथे कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी दिली.
महाराष्ट्रात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी महसूल व पुरवठा विभागाने धडक मोहीम राबवून अवैध गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. हॉटेल्स, धाब्यांवर छापा टाकून १९सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
काळाबाजार करणाऱ्यांचा सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
अशा कारवाया पुढील काळात सुरूच राहतील अशी माहिती तहसीलदार धनंजय बांगर व पुरवठा अधिकारी जालिंदर कदम यांनी दिली आहे.
घरगुती गॅसचा वापर हॉटेल, धाब्यांवर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यासपुरवठा विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणेकारवाई करेल अशी माहिती तहसीलदार धनंजय बांगर व पुरवठा अधिकारी जालिंदर कदम यांनी दिली आहे.
संपूर्ण राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना गॅसची साठेबाजी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात साठेबाजी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.