मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार पहा काय आहे कारण

0
1598

जामखेड न्युज——

मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार, पहा काय आहे कारण

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र २४ तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अपक्ष किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही असे स्पष्ट सांगितले.


आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्यामागील कारणंही सांगितले आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी 14 मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती.

तसेच आज सकाळी उमेदवारांची घोषणा करु असे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी सकाळी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजावर खापर फोडले.


आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही.

मित्रपक्षांनी उमेदवारांची नावं न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.


राजकीय प्रक्रिया हाताळणं सोपी गोष्ट नाही- जरांगे

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढे ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असेही जरांगे यांनी सांगितले.

राज्यात आता पुढे काय होणार?

दरम्यान, जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय गणित बदलणार आहे. निवडणूक लागण्यापूर्वी जरांगे यांनी निवडणुकीत सक्रियपणे उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बदलत्या राजकीय समिकरणाचा विचार करून आपली रणनीती आखली होती. मात्र त्यांनी आता थेट निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here