जामखेड न्युज——
हरणाला स्वतःचं दूध पाजणारा बिश्नोई समाज नेमका आहे कसा?
सिद्धू मुसेवाला अन् सलमान खान प्रकरणाशी काय संबंध?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं होतं. सिद्धूच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात होता, असं म्हटलं जातं. मात्र बिश्नोई समाजाला टार्गेट केलं जात असल्याचंही समाजातील लोक म्हणत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणांमध्ये बिश्नोई गँग नसून ही लॉरेन्स गँग असू शकते.
बिश्नोई गँग आणि लॉरेन्स गँगमध्ये खूप अंतर असल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी ट्वीट करुन आपल्या नावाच्या पुढे बिश्नोई लावलं आहे. त्यानंतर या गँगवर चर्चा सुरु झाली. सलमान खानच्या हरिण प्रकरणात बिश्नोई समाजाचं नाव चर्चेत आलेलं होतं. सलमानने काळवीट मारल्याने बिश्नोई गँग त्याच्या जिवावर उठल्याचं यापूर्वी उघड झालेलं आहे. बिश्नोई समाजाचं प्रकृतीवर असलेल्या प्रेम आणि प्राण्यांबद्दल असलेला जिव्हाळा; याची कायम चर्चा होत असते.
कोण आहेत बिश्नोई?
बिश्नोई लोक जोधपूरजवळच्या पश्चिमी रेगिस्तानातून येतात. या समाजाची ओळख निसर्गप्रेमी समाज म्हणून आहे. निसर्गाला हे लोक देव मानतात. त्यामुळे ते निसर्गाच्या रक्षणासाठी आपला जीवदेखील देतात. इतिहासात डोकावून बघितल्यास या समाजाने निसर्गाच्या रक्षणासाठी अनेक आंदोलनं केलेली आहेत. आंदोलनात लोकांचे जीवदेखील गेलेले आहेत.
वास्तविक बिश्नोई वीस (२०) आणि नऊ (९) मिळून बनलेला आहे. या समाजात २९ या आकड्याचं विशेष महत्व आहे. कारण हे लोक आपले आराध्यगुरु जम्भेश्वर यांनी सांगितलेल्या २९ नियमांचं पालन करतात. यामध्ये एक नियम शाकाहारी राहाणं आणि हिरवी झाडं न तोडणं, हाही आहे.
बिश्नोई समाजाचे लोक निसर्गासाठी आपला जीवही देतात आणि अशा लोकांना शहिदाचा दर्जा मिळतो. साधारण ५५० वर्षांपासून बिश्नोई समाज निसर्गाची पूजा करतो. राजस्थानसह हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात बिश्नोई आढळून येतात.
हरिणांना महिला दूध पाजतात
सोशल मीडियात काही फोटो नेहमी व्हायरल होताना आपण बघतो. ज्यात महिला आपलं दूध हरिणांच्या पिलांना पाजतात. या महिला बिश्नोई समाजाच्या असतात. त्या हरिणाच्या पिल्लांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात.
वन्य प्राण्यांसाठी बिश्नोई समाजाने राजेशाहीच्या काळात लढाया लढलेल्या आहेत. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, १७८७ मध्ये जेव्हा जोधपूर साम्राज्यात सरकारने झाडं तोडण्याचे आदेश काढले तेव्हा बिश्नोई समाजाचे लोक विरोधात येऊन उभे राहिले.
एवढंच नाही तर अमृतादेवी यांनी पुढाकार घेऊन झाडाच्या बदल्यात स्वतःला अर्पण केलं. तेव्हा बिश्नोई समाजाच्या ३६३ लोकांनी झाडांसाठी बलिदान दिलं होतं. चिपको आंदोलनातही या बिश्नोई समाजाचं मोठं योगदान आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना खून करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बिश्नोई समाजाबद्दल चर्चा सुरु झाली आहे.