जामखेड न्युज——
चुलत्यावर टीका तर पुतण्याबरोबर गुप्तगू आमदार रोहित पवार यांचा नवा डाव
आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या घरातच नवा डाव टाकला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अरण येथील कार्यक्रमात रोहित पवार आणि अनिल सावंत यांची भेट झाली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनिल सावंत हे पंढरपूरमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
रोहित पवार यांच्या भेटीनंतर अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अरण येथील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर जहरी टीका केली होती.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, असा इशाराच रोहित पवारांनी दिला होता.
इतकंच नाही, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तानाजी सावंत खोटा माणूस आहे. अशा माणसाला विधानसभा निवडणुकीत जाग दाखवली जाईल. त्यांच्या मतदार संघात परिवर्तन अटळ आहे. अशा शब्दांत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
अशातच तानाजी सावंत आणि रोहित पवार यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच त्यांचे पुतणे अनिल सावंत यांनी रोहित पवारांची भेट घेतली. त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे रोहित पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही, तर अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधीच मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर्स लावले आहेत.
या बॅनर्सवर अनिल सावंत यांचा ‘भावी आमदार’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. अनिल सावंत यांनी अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यानंतरही मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना आमदार करण्याची घाई झालेली दिसत आहे.