जामखेडम न्युज———
रामगिरी महाराजाच्या अटकेच्या मागणीसाठी जामखेडमध्ये मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा
जामखेडमध्ये रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल
स्वातंत्र्यदिनीअखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दुपारी खर्डा चौक येथुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव खर्डा चौकात दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येने जमले होते. ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ खर्डा चौक येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झााला. युवकांनी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉ. अरूण जाधव, भिमसैनिक विकी सदाफुले, संभाजी बिग्रेडचे कुंडल राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने व इतर राजकीय पक्ष ; संघटना सामील झाले होते .सर्व मुस्लीम समाजातील धर्मगुरू मुफ्ती अफजल कासमी, मुफ्ती मौलाना खलील अहमद व मुस्लीम समाज बहुसंख्येने उपस्थित होते .
रामगिरी महाराज यांनी धार्मिक प्रवचनात इतर धर्माचा अपप्रचार करणे हे अयोग्य व भावना दुखावणारे आहे असे यावेळी आंदोलकांनी म्हटले. तहसीलदार गणेश माळी व पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. आंदोलकांनी यावेळी रामगिरी महाराजावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी डी वाय एस पी वाखारे यांच्याकडे केली. तीन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. सोहेल अझरुद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहीता २०२३ चे कलम १९२,१९६,२९९,३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या मोर्चाला पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . हा मोर्चा शांततेत पार पडला.