जामखेड न्युज——
जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य, चिखल, दलदल व कचऱ्याचे ढिग, अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष
जामखेड शहरात सध्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जागोजागी घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी दुर्गंधी, जागोजागी कचऱ्याचे ढिग, दलदलीचे रस्ते, जागोजागी अतिक्रमणे, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून गटाराशेजारीच अतिक्रमणे झालेली आहेत. नगरपरिषदेची गटार, पाणीपुरवठ्याची पाईप लाईन कशी होणार अशा अनेक समस्या सध्या जामखेड शहरात आहेत. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. नागरिक मात्र समस्येच्या गर्तेत आहेत.
सध्या जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्याने धड चालताही येत नाही. सगळीकडे चिखल, दलदल तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. जामखेड चे रस्ते म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक व विद्यार्थी यांना मोठ्या अडचणी चा सामना करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी वारंवार नगरपरिषद कडे घाणीचे साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून घ्यावा असे पत्र दिलेले आहेत.
जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जि.प. पाणीपुरवठा उपअभियंता हे सहा महिन्यापासून कर्जतचे प्रभारी पदभार आहे. चारशे ते पाचशे कोटीची उलाढाल असणाऱ्या या सर्व जागा आहेत.एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या पदभारमुळे आठवड्यातून दोन दिवस कर्जत तर जामखेडकडे दोन दिवस तेही तीन ते चार उपस्थित असतात तर सातत्याने होणाऱ्या मिटिंग मुळे जनतेच्या प्रश्नाकडे, तक्रारीकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे आ. रोहीत पवार व आ. राम शिंदे यांच्यात कामावरून श्रेयवाद रंगतो मात्र आपली शक्ती खर्च करून कर्जतच्या प्रभारीराजचा प्रश्न कधी मिटवणार याकडे कर्जत जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जामखेड नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे
दोन वर्षांपासून पदभार आहे. प्रशासक म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी डॉ. देशमुख आहेत. ते कधीच नगरपरिषदेत येत नाही ५० हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहरात हे दोन्ही अधिकारी फिरकले नाही केवळ कार्यालयात बसून काम चालते सर्वसामान्य नागरिकांच्या कितीही तक्रारी आल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यातच मुख्याधिकारी साळवे यांना नऊ दहा महीन्यापासून कर्जत नगर पंचायतचा प्रभारी पदाचा पदभार आहे. या पंचायतमध्ये लोकप्रतिनिधी नियुक्त नगवराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवक आहेत. पण तेथे मुख्याधिकारी नाही. जामखेडची पाणीपुरवठा योजना,शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर कोट्यावधी रूपयाची कामे मोठय़ा प्रमाणावर चालू आहे.
ज्या ठिकाणी आरोप होतील त्या संबंधितांना केवळ नोटीसा द्यायच्या मात्र काहीच कारवाई करायची नाही व नागरीकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करायचे याबाबत मुख्याधिकारी साळवे यांचा हातखंडा आहे.
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ दोन अडीच वर्षांपासून आहेत. जामखेड तालुक्यात रोजगार हमीचे कामे व सिंचन विहिरीचे जवळ पास पाचशे कोटीच्या आसपास कामे दोन वर्षांपासून चालू आहेत. सिंचन विहिरीसाठी चार लाख अनुदान आहे. साडेतीन हजार विहीरीचे कामे चालू आहे. याबाबत जिल्हा परिषद कडून चौकशी चालू आहे कामात अनियमितता आढळल्याचे चौकशी अहवालात नमुद आहे. मागील चार महिन्यापासून गटविकास अधिकारी यांना कर्जतचा प्रभारी पदाचा पदभार आहे. आठवड्यातून दोन दिवस दोन्ही तालुक्यांना व नगर येथे असणा-या मिटींग यामुळे कामे रखडली आहे.
जिल्हा परिषदचे शाखा अभियंता विठ्ठल माने यांच्या कडे पाणीपुरवठा उपअभियंता पदाचा पदभार अडीच वर्षांपासून आहे. वर्षभरापासून जलजिवन मिशनचे तीनशे कोटीचे कामे चालू आहेत. त्यांना कर्जत जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपअभियंता पदभार तीन महिन्यांपासून आहे. कर्जतला ४० ते ५० गावात जलजिवन मिशनचे कामे चालू आहे. दोन्ही पदभार असल्याने जलजिवन मिशनच्या कामात तक्रारी वाढल्या आहेत.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे त्यामुळे ते पद रिक्त आहे. या पदाचा कारभार अतिरिक्त गटविकास अधिकारी कैलास खैरे यांच्याकडे शिक्षण विभागाच्या अनेक योजना राबविण्यात अडसर येत आहे.
अर्थिकदृष्टीने ताकदवान असलेले जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता हे कर्जत येथे प्रभारी आहेत. कोटय़वधी रुपयांचे व्यवहार होणाऱ्या संस्थेतील जागा रिक्त ठेवण्यात दोन्ही लोकप्रतीनीधीचा काय हेतु आहे याबाबत नागरिकांतून साशंकता व्यक्त केली जात आहे.