कोहिनूर हिरा कोणाचा – भारत-पाकिस्तानमध्ये नवा वाद होणार !

0
206
जामखेड न्युज – – 
जगातील सर्वात चर्चित आणि महागड्या हिऱ्यांपैकी असलेल्या कोहिनूर हिऱ्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील लाहोर हायकोर्टात मंगळवारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून कोहिनूर हिरा पुन्हा आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. हायकोर्टाने १६ जुलै रोजी सरकारला आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
याचिकाकर्ते वकील जावेद इक्बाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, भारत सरकार कोहिनूर हिरा पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपल्या प्रयत्नांना अधिक वेग देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. ब्रिटिशांनी हा कोहिनूर हिरा महाराजा दलीप सिंग यांच्याकडून हिसकावला होता. त्यानंतर लंडन येथे नेण्यात आला.
इक्बाल यांनी याचिकेत म्हटले की, ब्रिटनच्या महाराणीचा या हिऱ्यावर कोणताच अधिकार नाही. हा हिरा पंजाबच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. कोहिनूर हिरा पुन्हा आणण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडनमधील संग्रहालयातील राजमुकुटात आहे. हा हिरा जवळपास १०८ कॅरेटचा आहे.
वर्ष २०१० मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून भारत दौऱ्यादरम्यान म्हटले होते की, कोहिनूर हिरा पु्न्हा भारताला दिल्यास ब्रिटिश संग्रहालय गर्दीअभावी ओस पडेल. दरम्यान, भारत सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते की, ब्रिटिशांनी हा हिरा बळजबरीने नेला नाही, अथवा चोरीदेखील केली नाही. पंजाबच्या संस्थानिकांनी ईस्ट इंडिया कंपनीला हा कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता. हा हिरा पुन्हा भारतात आणण्यासाठी काही कायदेशीर अडचणीदेखील आहेत. हिरा भेट दिला तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्यामुळे पुरातत्व अवशेष आणि कला संपदा अधिनियम १९९२ लागू होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here