जामखेड न्युज——
दैनिक चंपावतीपत्र चा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड, नामदेवराव क्षीरसागर यांचे निधन
दै. चंपावती पत्र चे संपादक तथा बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्म पितामह नामदेवराव दादा क्षीरसागर वय 83 वर्षे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असून नामदेवराव दादा यांच्या दुःखद निधनाने बीड जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी कृती समितीचे निमंत्रक म्हणून नामदेवराव दादा क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामासाठी अनेक वर्षांपासून मोठी चळवळ उभी केली होती. बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्मपितामह तसेच चंपावती रत्न अशी देखील नामदेवराव दादा क्षीरसागर यांची महती होती.
आज वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले असून आपल्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक व आदर्श असे व्यक्तिमत्व असलेले नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाबद्दल मी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच क्षीरसागर परिवार व दैनिक चंपावती पत्र परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे व नामदेवराव क्षीरसागर यांच्यात अखेरची भेट झाली तेव्हा सुद्धा बीड रेल्वे यांसह बीड जिल्ह्यातील विकासकामांच्या संदर्भातच दादांनी श्री मुंडे यांच्याशी चर्चा केली होती.
बीड जिल्हा व मराठवाड्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला. केवळ पत्रकारिताच नव्हे तर विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांनी केले. एक मनमिळावू आणि व्यासंगी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने जिल्हा एका
ज्येष्ठ व अभ्यासू संपादकाला मुकला असून पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त
केल्या.
दै चंपावती पत्रचे ज्येष्ठ मुख्य संपादक,पत्रकारीता क्षेत्रात ज्यांना भिष्माचार्य म्हणुन ओळखले जायचे,नगर बीड परळी रेल्वे मार्ग पुर्ण व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन शासनाला वेळो वेळी जाग आणुन देणारे बीड रेल्वे संघर्ष कृती समीतीचे अध्यक्ष नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले अंत्यविधी सां ५ वा अमरधाम मोंढा रोड बीड