जामखेड न्युज——
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली अविनाश पाठक यांची नियुक्ती

राज्यातील लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतींमध्ये बीड लोकसभा (Beed) मतदारसंघाची लढत झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध महायुतीच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट सामना रंगला होता. सुरुवातीला सहजसोपी वाटत असलेली बीडची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली. मात्र, निवडणूक प्रचारात बीड मतदारसंघात जातीय तेढ पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाठक सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांची या पदावरून आता बीड जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थानच बीड जिल्हा बनलं होतं. त्यामुळे, बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय संघर्ष दिसून आलं. या वादामुळे येथील निवडणूक जशी गाजली, तशीच मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपामुळेही बीडची निवडणूक चर्चेत होती. आता, निवडणूक निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक दरम्यान बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते. त्यामुळे, त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून थेट तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना मतमोजणीवेळी सहभागी न होऊ देण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे, बीडच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे वादग्रस्त ठरल्या. अखेर दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरुन बदली झाली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने दीपा-मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आल्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे.

शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, बीड या पदावर श्रीम. दिपा मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक
बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पाठक हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांची या पदावरून आता बीड जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.




